देशाला सशक्त, समृद्ध करणारा 'अर्थसंकल्प'; उदयनराजेंची प्रतिक्रिया आली समोर I Udayanraje Bhosale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale Budget

शेती क्षेत्रात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचा निर्धार हा त्यांना सक्षम करणारा आहे.

Udayanraje Bhosale : देशाला सशक्त, समृद्ध करणारा 'अर्थसंकल्प'; उदयनराजेंची प्रतिक्रिया आली समोर

सातारा : कृषिप्रधान देशाच्या अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून प्रारंभ झालेल्या देशाच्या अमृतकाळातील सर्व जनहिताय असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिलीये.

केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला, यावर आता खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आभार मानले आहेत.

उदयनराजेंनी म्हटलं, की 'सर्व वर्गांना आणि घटकांना दिलासा देणारा व त्यांना मदत करणारा हा अर्थसंकल्प (Budget) आहे. सुमारे १० लाख कोटी पायाभूत सुविधांवर गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. याशिवाय राज्यांना ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्यातून राज्यांनाही पायाभूत सुविधांमध्ये गती देता येणार आहे. २७ कोटी लोकांना ईपीएफओच्या कक्षेत आणण्यामुळे सामाजिक सुरक्षेचाही मोठा विचार करण्यात आला आहे. कृषी पतपुरवठ्याकरिता २० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.'

शेती क्षेत्रात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचा निर्धार हा त्यांना सक्षम करणारा आहे. शेती क्षेत्राचा कायम सबसिडी (Subsidy) म्हणून विचार करून चालणार नाही, तर त्याही पलीकडे जाऊन नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला आहे. ॲग्रिकल्चर अक्सलेरेटेड फंड उभारणे, ॲग्रो टुरिझमला चालना या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश अर्थसंकल्पात आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला फार मोठा दिलासा या अर्थसंकल्पाने दिला आहे. प्राथमिक कृषी पत सोसायट्या आता मल्टिपर्पज सोसायट्या म्हणून काम करू शकणार आहेत. गावपातळीवर सहकार भक्कम होणार आहे. कोल्ड स्टोअरेज ते पेट्रोल पंप या क्षेत्रात ६३ हजार सोसायट्या काम करू शकणार आहेत. एकंदरीतच देशाला सशक्त आणि समृद्ध करणारा हा अर्थसंकल्प आहे, असंही उदयनराजे म्हणाले.