Budget 2021 : शाश्‍वत विकासासाठी पायाभरणी 

डॉ. कैलास बवले
Tuesday, 2 February 2021

अर्थसंकल्प समतोल करण्याची तारेवरील कसरत होती. ती चांगल्या प्रमाणात वित्तमंत्र्यांनी साध्य केली असे म्हणता येईल. शेती व ग्रामविकासाशी संबंधित विभागांची अंदाजपत्रकीय तरतूद पाहता त्यामध्ये भरघोस वाढ केल्याचे दिसून येते. 

कोरोनाच्या महासंकटानंतर हा पहिला अर्थसंकल्प असल्याने या संसाधनांच्या मर्यादेची बाब लक्षात घेता हा अर्थसंकल्प समतोल करण्याची तारेवरील कसरत होती. ती चांगल्या प्रमाणात वित्तमंत्र्यांनी साध्य केली असे म्हणता येईल. शेती व ग्रामविकासाशी संबंधित विभागांची अंदाजपत्रकीय तरतूद पाहता त्यामध्ये भरघोस वाढ केल्याचे दिसून येते. 

Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा  

ऑपरेशन ग्रीन योजनेत २२ नाशवंत शेतीमालांचा समावेश केल्याने शेती क्षेत्राला आधार मिळाला आहे. अर्थसंकल्पात मत्स्यशेतीसाठी स्वतंत्र तरतूद आहे. याशिवाय, किमान आधारभूत किमतीची हमी व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्यासाठी कृषी संरचना निधीची उभारणी ही महत्त्वाची बाब नव्यानेच निर्माण केली आहे. विकास हा पर्यावरणस्नेही व शाश्‍वत तत्त्वाधरित व्हावा या दृष्टीनेही या अर्थसंकल्पात प्रदूषण कमी करण्यासाठी व हरित ऊर्जा वापर वाढावा म्हणून सौरऊर्जा महामंडळास १ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची तरतूद केली आहे. नॅचरल गॅसचा वाढता वापर, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा पथदर्शी असतो व त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होते हा अनुभव लक्षात घेऊन डिजिटल व्यवहार वाढावेत यासाठीही प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ई-नाम बाजारांची संख्या १ हजाराने वाढावी यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. कृषीसाठी १६.५० लाख कोटी पतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रासाठी झालेली तरतूद शेती व ग्राम विकासासाठी प्रत्यक्ष परिणाम करणारी आहे. गहू, कापूस, तांदूळ यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद ही अजून एक आधाराची बाजू आहे. 

Budget 2021: कुणाला दिलासा, कुणाला निराशा; बजेटसंबंधी 10 महत्त्वाच्या बातम्या...

जलजीवन मिशन हे जसे शहरी भागासाठी आहे, तसेच लघू सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण विकासास साह्यभूत ठरणाऱ्या इतर क्षेत्रांचाही विचार करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळ विकास हा घटक महत्त्वाचा आहे. मनुष्यबळ विकासासाठी साह्यभूत ठरणाऱ्या आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांचाही विचार करावा लागतो. आरोग्य विभागासाठी २.२३ लाख कोटी ही तरतूद मागील वर्षीपेक्षा १३७ टक्क्यांनी वाढीव आहे. शिक्षण विभागाच्या दृष्टीने उच्च शिक्षण आयोगाची स्थापना, १०० सैनिकी शाळांची स्थापना ही ग्रामीण विकासाला हातभार लावणारी बाब आहे. उच्च शिक्षण विभागासाठी ५० हजार कोटी रुपये राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनद्वारे खर्च करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील संशोधन हे ग्रामीण भागाच्या समस्या शोधणे व त्यावर उपाय शोधणारे झाल्यास त्याचा ग्रामीण विकासाला निश्‍चित फायदा मिळेल, असे वाटते. थोडक्यात, हा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला आधार देणारा, ग्रामविकासास गती देणारा आणि शाश्‍वत विकासासाठी पायाभरणी करणारा असा आहे. 

बजेटच्या घोषणांमुळे काय स्वस्त, काय महाग? वाचा सविस्तर

ठळक तरतूदी 
- कृषी व शेतकरी कल्याण विभागासाठी १,३९,५३९ कोटी 
- ग्रामीण विकासासाठी १,३३ ३९० कोटी 
- ग्राहक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी २,५६,९४८ कोटी 

प्लस 
- ऑपरेशन ग्रीन योजनेमुळे शेती क्षेत्राला आधार 
- बाजारभाव दीड पट करण्यासाठी प्रयत्न 
- हरीत ऊर्जेच्या वापरावर भर 
- डिजिटल व्यवहारांवर भर 

रेटींग १० पैकी ६ 

 डॉ. कैलास बवले
समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्‍वत ग्रामविकास केंद्र, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget 2021 sustainable development article by Dr kailas bavale