कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेला तोंड देण्याची तयारी; १५ दिवसांचा औषधांचा ‘बफर स्टॉक’ 

महेंद्र महाजन
Saturday, 14 November 2020

पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेला असताना दीपोत्सवानिमित्त खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. त्यास फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाची जोड मिळताच कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता युरोपियन देशातील अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर वर्तविण्यात येत आहे.

नाशिक : पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरलेला असताना दीपोत्सवानिमित्त खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. त्यास फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाची जोड मिळताच कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता युरोपियन देशातील अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर वर्तविण्यात येत आहे.

दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने यंत्रणांना सूचना

आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणानुसार रुग्णोपचार सुविधा कार्यान्वित करण्याचे सूचविण्यात आले आहे. 
प्रत्येक जिल्हा आणि महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव सर्वाधिक होता त्या वेळी लागलेल्या औषधे आणि साधनसामग्रीची गरज लक्षात घेऊन त्याच्या किमान पन्नास टक्के साठा उपलब्ध असेल याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. पंधरा दिवसांचा औषधे आणि साधनसामग्रीचा ‘बफर स्टॉक’ उपलब्ध ठेवण्याची खबरदारी घ्यायची आहे. प्रयोगशाळा नमुन्याचे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण सात टक्क्यांपेक्षा कमी असल्यास रुग्ण संख्येनुसार जिल्हा आणि महापालिकास्तरावर किमान पाच ते सात रुग्णालये समर्पित कोरोना रुग्णालय म्हणून कार्यरत ठेवायचे आहेत.

ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडणार नाही,

एकूण कोरोना रुग्णालयांच्या वीस टक्के हे प्रमाण असेल. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण सात ते दहा टक्के असल्यास सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि प्रत्येक शहरी प्रभाग, तालुक्यात एक रुग्णालय कार्यान्वित करायचे आहे. प्रमाण ११ ते १५ टक्के असल्यास आवश्‍यकतेनुसार आणखी वीस टक्के, १६ ते २० टक्के असल्यास मल्टिस्पेशालिटी व्यवस्थापनाची सोय असलेली सर्व रुग्णालये, तर २० टक्क्यांहून अधिक असलेल्या कोरोनासाठी यापूर्वी निवडण्यात आलेली सर्व प्रकारची रुग्णालये सुरू करायची आहेत. कोणत्याही कारणाने ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडणार नाही, याची खातरजमा करण्यास डॉ. पाटील यांनी सांगितले आहे. 

गंभीर रुग्णांना संदर्भसेवा 
जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात गंभीर रुग्णांना संदर्भसेवा देण्यासाठी यंत्रणा सुसज्ज असणे आवश्‍यक असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णवाहिका सुविधांबद्दलची माहिती सर्वसामान्य जनतेला द्यायची आहे. साठ वर्षांपेक्षा अधिक वय आणि अतिजोखमीचे आजार (कोमॉर्बिड)असलेल्या व्यक्तींनी आवश्‍यक तेवढा आणि मर्यादित जनसंपर्क ठेवण्याची आवश्‍यकता आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर अतिजोखमीच्या आजारावर योग्य व नियमित उपचार आणि नियंत्रित ठेवण्याबाबत मार्गदर्शन करायचे आहे. कोमॉर्बिडीटी क्लिनिक सुरू करायचे आहे. तसेच ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी‘ अभियानांतर्गत अतिजोखमीच्या व्यक्तींच्या केलेल्या सर्वेक्षणाची यादी उपकेंद्र आणि वॉर्डस्तरावरील आरोग्य कर्मचाऱ्यांकडे देऊन साप्ताहिक तपासणी करण्यात यावी, असे डॉ. पाटील यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

क्षेत्रीयस्तरावर पथकाची स्थापना 
कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासंबंधी क्षेत्रीयस्तरावर विविध महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी क्षेत्रीयस्तरावर उपकेंद्र, वॉर्डनिहाय पथके कार्यरत असावी. त्यांच्या माध्यमातून घरगुती विलगीकरणात असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन दैनंदिन करावे. त्यासाठी कृती दलाने सूक्ष्म नियोजन करावे. सध्या रुग्णसंख्या कमी असली, तरीही त्याची प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सखोल व्हावे. फ्लूसदृश्‍य रुग्णांचे नियमितपणे सर्वेक्षण करावे. हॉटस्पॉट, वृद्धाश्रम, औद्योगिक क्षेत्र, स्थलांतरित मजुरांच्या वस्तीकडे विशेष लक्ष द्यावे, हेही डॉ. पाटील यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.  

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 day buffer stock of medicine for corona nashik marathi news