मरगळलेला रिअल इस्टेट मार्केट पुन्हा तेजीत; 4 दिवसांत सोळाशेंवर दस्त नोंदणी

REAL ESTATE.jpg
REAL ESTATE.jpg

नाशिक : कोरोनामुळे मरगळलेल्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर चैतन्य निर्माण झाले असून, विजयादशमीच्या चार दिवसांत तब्बल एक हजार ६८१ दस्तांची नोंदणी झाली. नोंदणी झालेल्या मालमत्तांचे बाजारमूल्य ८७४ कोटी रुपये होते. त्यातून दोन कोटी ५८ लाख रुपये मुद्रांक शुल्क प्राप्त झाले. मुद्रांक शुल्क तीन टक्क्यांनी घटविल्याचा हा परिणाम असून, दिवाळीच्या काळात अधिक गतीने मार्केट तेजीत येणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत. 

सप्टेंबरमध्ये ११ हजार ४७२ दस्तांची नोंद

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. सर्वाधिक आर्थिक फटका रिअल इस्टेट व्यवसायाला सहन करावा लागला. अद्यापही हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी झाली होती. त्यामुळे २०२० हे वर्ष तेजीत जाईल असा अंदाज असताना कोरोनाची आडकाठी निर्माण झाली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आठ हजार २२८ दस्तांची नोंद झाली होती. २०२० मध्ये एकही दस्त नोंदविण्यात आला नाही. मागील वर्षाच्या मेमध्ये दहा हजार २९, जूनमध्ये नऊ हजार ७४७, जुलैमध्ये दहा हजार ५२४, ऑगस्टमध्ये नऊ हजार २६२, सप्टेंबरमध्ये आठ हजार ५७६ दस्तांची नोंदणी झाली होती. या वर्षात म्हणजे २०२० मध्ये एप्रिलमध्ये एकही दस्त नोंदविला गेला नाही. मेमध्ये दोन हजार २४७, जूनमध्ये आठ हजार १३, जुलैत १० हजार ५२९, ऑगस्टमध्ये दहा हजार ५०२, सप्टेंबरमध्ये ११ हजार ४७२ दस्तांची नोंद करण्यात आली. 

मुद्रांक शुल्क घटविल्याचा परिणाम 

विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सातही मुद्रांक नोंदणी कार्यालयांत एक हजार ६८१ दस्तांची नोंद करण्यात आली. २२ ते २६ ऑक्टोबर या चार दिवसांत नोंदणी केलेल्या मिळकतींचे बाजारमूल्य ८७४ कोटी ९८ लाख ७५ हजार ४३९ होते. त्यावर ३ टक्के मुद्रांक शुल्कानुसार शासनाला दोन कोटी ५८ लाख सात हजार ६७७ महसूल प्राप्त झाला. 

बांधकाम क्षेत्राला नव्याने ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांनी कपात केल्याने त्याचा परिणाम दस्त नोंदणीवर होताना दिसत असून, सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होत आहे. - कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com