पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

दीपक अहिरे
Thursday, 22 October 2020

टोमॅटोची राजधानी म्हणून पिंपळगाव बसवंतची ओळख आता अधिक गडद झाली आहे. नाशिकसह परजिल्ह्यातून शेतकरी येथे टोमॅटो विक्रीसाठी येतात. गोलाकार, कवडी फुटलेला असा दर्जेदार पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील टोमॅटोचा यंदाही देशभर डंका राहिला. 

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : टोमॅटोची राजधानी म्हणून पिंपळगाव बसवंतची ओळख आता अधिक गडद झाली आहे. नाशिकसह परजिल्ह्यातून शेतकरी येथे टोमॅटो विक्रीसाठी येतात. गोलाकार, कवडी फुटलेला असा दर्जेदार पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील टोमॅटोचा यंदाही देशभर डंका राहिला. 

पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरा डंका 
टोमॅटोचे दर सरासरी ५०० रुपये प्रतिक्रेट्सच्या पातळीवर राहिल्याने कोरोनाच्या संकटात उत्पादकांसाठी हे पीक आर्थिक आधार देणारे ठरले आहे. लॉकडाउन आणि त्यानंतर संततधारेमुळे या वर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाचा संदर्भ टोमॅटोला जोडण्याची अफवा पसरली. अशा विपरित परिस्थितीत निफाड, दिंडोरी, चांदवड परिसरांत मोठे क्षेत्र टोमॅटोच्या लागवडीखाली आले. सुरवातीला पाऊस चांगला झाल्याने लागवड वेळवर झाली. मात्र, अतिपावसाने टोमॅटोच्या पिकाला दणका बसला. त्याचा उत्पादनांवरही परिणाम झाला. तरीही ऑगस्ट महिन्यापासूून पिंपळगाव बसवंतचा टोमॅटो मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात येथे पोचत आहे. मागील दोन महिन्यांपासून दररोज किमान एक लाख क्रेट्स टोमॅटो मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह राजधानी दिल्लीपर्यंत पोचले आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

दररोज एक लाख क्रेट्स रवाना 
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मागील दोन महिन्यांपासून टोमॅटोने गजबजली आहे. हंगाम बहरल्यापासून दररोज एक लाख क्रेट्स टोमॅटो परराज्यात ट्रकद्वारे पोचत आहे. नाशिक, गिरणारे, लासलगाव येथून ७० हजार क्रेट्स टोमॅटो परराज्यात जात आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 
टोमॅटोस जुगारी पीक म्हणून हिणवले जाते. दरातील मोठ्या प्रमाणातील चढ-उतारामुळे शेतकरी बऱ्याचदा कंगाल तर कधी कधी मालामाल, असे चित्र असते. यंदा मात्र टोमॅटोच्या दराने प्रतिक्रेट्स ५०० रुपयांची पातळी सोडलेली नाही. तर कमाल ९०१ रुपयांपर्यंत भाव आहे. त्यामुळे धोका पत्करून टोमॅटोचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी हे वर्ष द्राक्षबागेपेक्षा अधिक उत्पन्न देणारे ठरले आहे. १५ ऑगस्ट ते १९ ऑक्टोबरपर्यंत पिंपळगाव बाजार समितीत ८३ लाख ८५ हजार टोमॅटो विक्रीसाठी आले. त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात ४२८ कोटी ३७ लाख सहा हजार ९०० रुपये पडल्याने कष्टाचे चिज झाले आहे. 

अजून दोन महिना हंगाम 
ऑगस्टमध्ये टोमॅटो हंगामाचा पडदा उघडल्यानंतर जानेवारीपर्यंत हंगाम सुरू असतो. यंदा पावसाने टोमॅटोच्या पिकाची नासाडी केल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हंगाम महिनाभर आधीच गुंडाळला जाण्याची शक्यता आहे. अजून दोन महिने हंगाम सुरू राहणार असून, आवक मात्र घटत जाणार आहे. डिसेंबरच्या मध्यावर हंगाम थांबण्याची शक्यता आहे. 

 

बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या नेटक्या नियोजनामुळे पिंपळगाव बाजार समितीही टोमॅटोची राजधानी बनली. आडतदारही परप्रातीय व्यापाऱ्यांशी व्यवहार करण्याचा धोका पत्करून कामकाज करतात. यंदाचे वर्ष टोमॅटो उत्पादकांना आर्थिक आधार देणारे ठरले आहे. -सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpalgaon tomatoes popular all over the country nashik marathi news