नाशिकचा बेदाणा सातासमुद्रापार! तीन महिन्यांत २० हजार टन विक्री; सव्वाशे कोटींची उलाढाल   

एस. डी. आहिरे 
Monday, 26 October 2020

कोरोनाच्या आपत्तीने बेदाणा उत्पादकांना कोंडीत पकडले होते. मात्र यात कोरोनाने देशभरात सकल अन्नाबाबतचा आग्रह वाढला. त्याचा परिणाम पिवळ्या पाचूला मागणी वाढली.

नाशिक/पिंपळगाव बसवंत : कोरोना शेतीमाल व उद्योगांसाठी आपत्ती ठरली असताना बेदाण्यासाठी पूरक ठरल्याचे चित्र आहे. कारण तीन महिन्यांत नाशिक जिल्ह्यातून २० हजार टन बेदाणा देश-परदेशात विकला गेला. त्यातुन सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल झाली. सणासुदीच्या काळात उर्वरित शिल्लक २५ हजार टन बेदाण्याची चांगल्या दराने विक्री होईल, असा अंदाज आहे. 

कोरोनाच्या आपत्तीने बेदाणा उत्पादकांना कोंडीत पकडले होते. मात्र यात कोरोनाने देशभरात सकल अन्नाबाबतचा आग्रह वाढला. त्याचा परिणाम पिवळ्या पाचूला मागणी वाढली. नाशिक जिल्ह्यात यंदा ४५ हजार टन दर्जेदार बेदाण्याची निर्मिती झाली. नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याची देशांतर्गत राज्यांसह युरोप, युक्रेन, मलेशिया, सिंगापूर, सौदी अरेबिया, श्रीलंका येथेही निर्यात झाली. सुमारे पाच हजार टन बेदाणा परदेशात पोचला, तर पंधरा हजार टन बेदाणा देशांतर्गत विकला गेला. सुकामेव्याच्या तुलनेत बेदाण्याचे दर कमी असल्याने मागणी वाढली. उत्तम प्रतीच्या बेदाण्याला प्रतिकिलो ८० ते ९५ रुपये दर मिळाला. येणारे दिवस सणासुदीचे असल्याने या दरात आणखी वाढीची चिन्हे आहेत. नवा हंगामही लांबणार असल्याने बेदाण्याचा पुढील वर्षीही चांगला उठाव होणार आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

नाशिकचा बेदाणा पोचला सातासमुद्रापार

नाशिक जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी बेदाण्याचे अवघे दोन ते तीन हजार टन उत्पादन व्हायचे. आता दर्जेदार उत्पादनाची हातोडी शेतकऱ्यांना आली असून, व्यापाऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञान आणल्याने प्रतवारी होऊ लागली आहे. आता नाशिकचा बेदाणा सातासमुद्रापार पोचत आहे. त्यामुळे उत्पादनाचा आलेख उंचावल्याने नाशिकचा पिवळा बेदाणा कात टाकत आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लिलाव प्रक्रिया पार पडते. 
 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

द्राक्षांचे प्रमुख उपउत्पादन म्हणून बेदाणा हा सक्षम पर्याय शेतकऱ्यांना मिळाला आहे. बेदाण्याचा चांगला उठाव होत असल्याने नाशिकची द्राक्ष, कांद्याबरोबरच बेदाण्यामुळेही कनेक्टिव्हिटी वाढत आहे. कोरोनाच्या काळात बेदाण्याच्या उलाढालीचा आलेख उंचावत राहिला आहे. 
- शीतलकुमार भंडारी (अध्यक्ष, बेदाणा व्यापारी असोसिएशन, नाशिक) 

पोटॅशियम, लोह, कॅल्शिअमचा भरपूर स्त्रोत म्हणून बेदाण्याचे आहारात महत्त्व आहे. आजारामुळे येणाऱ्या अशक्तपणात तो गुणकारी आहे. इतर सुकामेवाच्या तुलनेत तो स्वस्तही असल्याने आहरात वापर करावा. 
- डॉ. उमेश आहेर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 thousand tons of raisins sold in three months nashik marathi news