जिल्ह्यात १२३ दिवसांनंतर निच्चांकी रुग्णांची नोंद; दिवसभरात २०० रुग्ण कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Sunday, 8 November 2020

रविवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १०१, नाशिक ग्रामीणचे ४४, मालेगावचे ७ तर जिल्‍हाबाह्य एक कोरोना बाधित आढळून आला आहे.

नाशिक : जिल्ह्या‍तील कोरोना बाधितांच्‍या संख्येत सातत्‍याने घट होते आहे. रविवारी (ता.८) दिवसभरात १५३ कोरोना बाधित नव्‍याने आढळले असून, तब्‍बल १२३ दिवसांनंतर निच्चांकी रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी गेल्‍या ७ जुलैला ११७ बाधित आढळून आले होते. त्‍यानंतर सातत्‍याने दीडशेहून अधिक रुग्ण दिवसभरात आढळत होते. दरम्‍यान आज दिवसभरात दोनशे रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, दोन रुग्णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्या‍त २ हजार ८०७ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक शहरातील १०१ बाधित

रविवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १०१, नाशिक ग्रामीणचे ४४, मालेगावचे ७ तर जिल्‍हाबाह्य एक कोरोना बाधित आढळून आला आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील १८२, नाशिक ग्रामीणचे दहा, मालेगावचे चार तर जिल्‍हाबाह्य चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दोन मृतांमध्ये नाशिक शहरातील एक व नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील रामदास स्‍वामीनगर येथील ८३ वर्षीय तर निफाड येथील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

९० हजार ९९६ रूग्‍ण कोरोनामुक्त

यातून जिल्ह्या‍तील एकूण बाधितांचा आकडा ९५ हजार ५०४ झाला असून, यापैकी ९० हजार ९९६ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्या‍त कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूच्‍या आकड्याने सतराशेचा टप्पा ओलांडला असून, आत्तापर्यंत १ हजार ७०१ रुग्णांचा मृत्‍यू कोरोनामुळे झाला आहे. दिवसभरात दाखल रुग्णांमध्ये नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात ५०३, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात १४, मालेगाव महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात तीन, जिल्‍हा रुग्णालयात दोन रुग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ६२६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ३५५ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील असून, १८८ प्रलंबित अहवाल नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णांचे आहेत.

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 corona patients recovered in nashik district marathi news