महसुलाची वाळू ठेक्यांवर २४ तास नजर; विभागीय आयुक्तांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

आयुक्त गमे म्हणाले, की विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याखाली असलेल्या वाळूघाटांचा शोध घेऊन पारंपरिक पद्धतीने त्या खाली असलेल्या वाळूचा अंदाज काढून वाळू लिलावाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच बेकायदेशीर मार्गाने होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी टोलनाक्यावर २४ तास महसूल पथकांची नेमणूक करून वाळूचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. 

नाशिक : अवैध वाळूचोरी रोखण्यासाठी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील टोलनाक्यांवर २४ तास महसूल पथकाची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी (ता. 14) महसूल आढावा बैठकीत दिले. 

वाळूचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई 

आयुक्त गमे म्हणाले, की विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याखाली असलेल्या वाळूघाटांचा शोध घेऊन पारंपरिक पद्धतीने त्या खाली असलेल्या वाळूचा अंदाज काढून वाळू लिलावाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच बेकायदेशीर मार्गाने होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी टोलनाक्यावर २४ तास महसूल पथकांची नेमणूक करून वाळूचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. 

गौण खनिजाचे उत्खनन आढळल्यास तत्काळ कारवाई 

नाशिक विभागातील सर्व दगडखाणींची ईटीएस मशिनने मोजणी करून परवानगीपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे आढळल्यास तत्काळ संबंधितांवर कारवाई करून वसुली करण्यात यावी. जमीन महसूल वसुली शंभर टक्के होण्यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर प्रत्येक आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घ्यावा. तसेच, बांधकाम परवानगीची प्रलंबित प्रकरणे, वनहक्क अधिनियम २००५ अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. तसेच ज्या- ज्या जिल्ह्यांमध्ये तलाठी कार्यालय प्रस्तावित केले आहे, अशा ठिकाणी लवकरात लवकर तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात. 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

जिल्ह्यात घरकुल योजनेचे काम वेळेत पूर्ण करा

सातबारा दुरुस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावी. ई-फेरफार आज्ञावलीची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी. अनधिकृत अकृषिक वापराच्या नोंदी घेऊन कार्यवाही करणे. तसेच इनाम व वतन जमीन शर्तभंग तपासणी व कार्यवाही करण्यात यावी. महामार्ग भूसंपादन प्रक्रिया सुरू असलेल्या प्रकरणामध्ये ताबा देणेवर शिल्लक असलेल्या क्षेत्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. तसेच ३१ जानेवारी २०२१ पर्यंत शिधापत्रिकांचे आधार सीडिंगचे काम पूर्ण करावे. प्रत्येक जिल्ह्यात घरकुल योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी बैठकीत दिल्या.  

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कार्यालयात पाचही जिल्ह्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे आढावा बैठक झाली. त्यात श्री. गमे बोलत होते. अपर आयुक्त भानुदास पालवे, उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडिलकर, उपायुक्त (पुनर्वसन) दत्तात्रय बोरुडे, उपायुक्त (रोहयो) अर्जुन चिखले, उपायुक्त (सा. प्र.) प्रवीण देवरे, उपायुक्त (पुरवठा) स्वाती देशमुख, उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, सहआयुक्त कुंदन सोनवणे उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम (मालेगाव), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (नगर), जिल्हाधिकारी संजय यादव (धुळे), जिल्हाधिकारी अभिजित राऊत (जळगाव), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (नंदुरबार) उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 hours revenue squad should be appointed at toll plazas in districts nashik marathi news