निफाड तालुक्यातील तब्बल २४ गावे पाणीयोजनेअभावी कोरडी;  माजी आमदारांचे पाणीपुरवठामंत्र्यांना निवेदन 

water crisis
water crisis

नाशिक/पिंपळगावं बसवंत : पाण्याने समृद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील २४ गावांमध्ये अद्याप पाणीयोजना पोचली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यामुळे तालुक्यात मुबलक पाणी असतानादेखील या गावातील महिलांना दैनंदिन पाण्याची गरज भागविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन संबंधित गावातील पाण्याची भीषणता शासनदरबारी पोचविली. 

नदी, कलावे, विहीर, कूपनलिका या जलस्त्रोतांचे वरदान निफाड तालुक्याला लाभले आहे. गावची तहान भागविण्यासाठी बहुतांश गावात पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या. नागरिकांच्या घरापर्यंत पाण्याचे नळ आले. पण तालुक्यातील २४ गावांतील नागरिकांना अद्याप पाणीयोजनेची प्रतीक्षा आहे. पाणीयोजना न पोचलेल्या बहुतांश गावांमध्ये राजकीयदृष्ट्या वजनदार नेते आहेत. पण पाणीयोजना आणण्यात ते अपयशी ठरले. काही गावांमध्ये पाणीयोजना आहे, त्या कालबाह्य झाल्याने पाणीपुरवठा होत नाही. सुकेणे, नांदुर्डीसारख्या मोठ्या गावांतील हजार लोकसंख्येच्या वस्तीवर पाणीयोजना पोचलेली नाही. त्यामुळे त्या चोवीस गावांतील महिला हातपंपावर किंवा विहिरीवर पाणी भरताना दिसतात. यातील काही गावांच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराच्या धुराळ्यात पाणीयोजनेचा मुद्दा गाजणार आहे. पाच ठिकाणी, तर प्रस्ताव पाठविले, योजना मंजूर झाली; पण स्वाहाकारातच योजनेचे पाणी मुरल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. बहुतांश गावालगतच बंधारे आहेत. पण इच्छाशक्तीअभावी पाणीयोजना नागरिकांच्या दारात पोचलेली नाही. 

पाणीयोजनेपासून वंचित गावे 

नांदुर्डी, पालखेड, चाटोरी, शिंपी टाकळी, उगाव, खेडे, आहेरगाव, जिव्हाळे, दिक्षी, सायखेडा, भुसे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, चांदोरी, वडाळी नजीक, अंतरवेली, दात्याने, काथरगाव, कोठुरे, लोणवाडी, पाचोरेवणी , पिंपळगांव, निपाणी, रानवड, शिवडी. 

आमदार नसलो तरी सरकारच्या माध्यामातून निफाड मतदारसंघाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी बांधिल आहे. त्या चोवीस गावांत नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 
-अनिल कदम (माजी आमदार). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com