रिअल इस्टेटमध्ये अडीचशे कोटींचे व्यवहार; दिवाळीत साडेतीन हजार दस्तांची नोंदणी

विक्रांत मते
Monday, 23 November 2020

गेल्या वर्षी याच कालावधी मध्ये दोन हजार ९१७ दस्तांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ७१७ दस्त या वर्षी अतिरिक्त नोंदविले गेले. गेल्या वर्षी शासनाला २३ कोटी चार लाख रुपये महसूल मिळाला होता, तर या वर्षी २५.७० कोटी महसूल मिळाला आहे.

नाशिक : कोरोनामुळे आर्थिक मंदी निर्माण झाल्याचे सांगितले जात असले तरी दिवाळीनिमित्त रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये झालेल्या उलाढालीचा विचार करता मंदी हटल्याचे संकेत मिळताना दिसत आहेत. दिवाळीनिमित्त नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात सरासरी अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, तब्बल तीन हजार ६३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ७१७ अधिक दस्त नोंदविण्यात आले. 

तीन हजार ६३४ दस्तांची नोंदणी

मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर तब्बल सात महिने रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती. आर्थिक मंदी कधी संपेल, याबाबत स्पष्ट होत नव्हते. परंतु दिवाळीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात सतरा दिवसांत झालेल्या आर्थिक उलाढालीचा विचार करता रिअल इस्टेट क्षेत्रावरील मंदी हटत असल्याचे दिसून येत आहे. जमीन, फ्लॅट, बंगला, गाळे आदी मालमत्तांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे होते. नाशिक जिल्ह्यात सात कार्यालये असून, त्यातील पाच कार्यालये शहरात आहेत. सातही कार्यालयांमध्ये १ ते १७ नोव्हेंबर या कालावधी मध्ये तीन हजार ६३४ दस्तांची नोंदणी झाली. 

पन्नास कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त

गेल्या वर्षी याच कालावधी मध्ये दोन हजार ९१७ दस्तांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ७१७ दस्त या वर्षी अतिरिक्त नोंदविले गेले. गेल्या वर्षी शासनाला २३ कोटी चार लाख रुपये महसूल मिळाला होता, तर या वर्षी २५.७० कोटी महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी मुद्रांकशुल्क सहा टक्के होते. या वर्षी तीन टक्के करण्यात आले. गेल्या वर्षाप्रमाणेच सहा टक्के मुद्रांकशुल्क असते, तर पन्नास कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला असता. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दिवाळीच्या निमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक दस्त नोंदणी झाली. यातून शासनाला २५ कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला. - कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक 

अशी झाली दस्तांची नोंदणी (१ ते १७ नोव्हेंबर, कोटी रुपयांमध्ये) 

आर्थिक वर्ष २०१९ २०२० 
एकूण दस्त संख्या २,९१७ ३,६३४ 
एकूण मुद्रांकशुल्क २०,६१,१८,०७३ २१,२९,१२,२१० 
एकूण नोंदणी फी २,४२,९५,५२० ४,४१,०४,७५० 

एकूण २३,०४,१३,५९३ २५,७०,१६,९६० 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 250 crore transactions in real estate nashik marathi news