थकबाकी भरा अन्‌ बिलमाफीसह पायाभूत सुविधाही मिळवा! महावितरणाचे शेतकऱ्यांना आवाहन

farmers.jpg
farmers.jpg

येवला (नाशिक) : तालुक्यातील कृषिपंपधारकांची वीजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतीच्या ४६ हजार ७२९ ग्राहकांकडे २६६ कोटी थकले आहेत. या शेतकऱ्यांना आता ५०-६० टक्के बिलमाफी मिळणार असून, भरलेल्या पैशांत पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी बिले भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

थकबाकी भरा अन्‌ बिलमाफीसह पायाभूत सुविधा, जोडण्याचा घ्या लाभ 

शासनाने कृषीधारकांसाठी कृषी धोरण आणले असून, या धोरणामुळे कृषीधारकांचे थकीत वीजदेयक जवळपास ५० ते ६० टक्के कमी होणार आहे. या धोरणात वीजजोडणीबाबत सवलती मिळणार आहेत. रोहित्रावर लोड उपलब्ध असल्यास ३० मीटरचे आत असल्यास तत्काळ वीजजोडणी मिळेल. २०० मीटरपर्यंत एबी केबलद्वारे वीजजोडणी करण्यात येईल. तर रोहित्रावर लोड उपलब्ध नसल्यास रोहित्रावर लोड वाढवून वीजजोडणी देणे व नवीन रोहित्र बसवून वीजजोडणी दिली जाईल. २०० ते ६०० मीटर अंतर असल्यास फंडाच्या उपलब्धतेनुसार वीजजोडणी करण्यात येईल. ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर योजनेद्वारे वीजजोडणी देण्यात येईल. वरीलपैकी योजनेमध्ये तत्काळ जोडणी हवी असल्यास ग्राहकाने स्वखर्चाने काम करून घ्यावे. नंतर वीज देयकातून परतावा देण्यात येणार आहे. 

२०२४ पर्यंत सवलत 

कृषी वीजदेयकाची थकबाकी वसुलीसाठी धोरण निश्‍चित केले आहे. सर्व उच्चदाब, लघुदाब, कृषी ग्राहक भाग घेण्यासाठी पात्र असून, त्यामध्ये चालू थकबाकीदार व कायमस्वरूपी खंडित पीडी ग्राहक पात्र आहेत. ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंत असेल. मागील कमाल पचा वर्षांपर्यंतचे (सप्टेंबर २०१५) वीजदेयक दुरुस्ती, तर मागील पाच वर्षांपर्यंतचे १०० टक्के विलंब आकार व पाच वर्षांपूर्वीचे विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ होईल. सुधारित थकबाकी तीन वर्षांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत गोठविण्यात येऊन ग्राहकांच्या देयकांमध्ये वेगळी दर्शविण्यात येणार आहे. 

वसुलीसाठी संस्थांना प्रोत्साहन 

कृषिपंपदेयक भरणा कार्यप्रणालीची पद्धत व प्रोत्साहनाचे स्वरूप असे आहे. ग्रामपंचायत, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, विविध कार्यकारी सहकारी संस्था, महिला बचतगट यांना प्रतिवीजबिल पावतीकरीता पाच रुपये एवढी रक्कम दिली जाईल. शेतकरी सहकारी संस्था व साखर कारखान्यांनी वसूल केलेल्या कृषी थकबाकीच्या रकमेवर दहा टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल. उर्वरित संस्थांनी ग्रामपंचायत, सहकारी संस्था कृषी थकबाकीचा भरणा स्वीकारल्यास मागील वर्षीचा भरणा व चालू वर्षीचा भरणा यातील वाढीव रकमेवर ३० टक्के प्रोत्साहन मोबदला दिला जाईल. भरणा केलेल्या रकमेच्या ३० टक्के प्रोत्साहन मोबदला दिला जाईल व चालू कृषी वीजबिलाचा भरणा स्वीकारल्यास भरणा केलेल्या रकमेच्या २० टक्के प्रोत्साहन मोबदला दिला जाईल. 

पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण 

थबबाकी वसुलीतून गावनिहाय वसूल झालेल्या ३३ टक्के रक्कम गावातील लीन, गाळे, डीपी, रोहित्र यासाठी खर्च करण्यात येईल. वसूल झालेल्या रकमेच्या ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरावरील नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसाठी खर्च करण्यात येणार आहे. 

थकबाकीत तर भरीव सूट मिळणार आहेच व नव्या वीजजोडण्या देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. जमा झालेले पैसे तुमच्या गावात नव्याने वीज सुविधांसाठी वापरात आणले जाणार आहे. म्हणजेच चारही बाजूंनी शेतकऱ्यांना फायदा असल्याने तत्काळ थकबाकी भरून सहकार्य करावे. - विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता, येवला 

...अशी आहे थकबाकी (कोटीत) 

प्रकार - एकूण ग्राहक - रक्कम 
घरगुती, वाणिज्य - १२,७२९ - ४.३२ 
शेतीपंप शहर उपविभाग- १४,००० - ११० 
शेतीपंप ग्रामीण उपविभाग- २०,००० -१५२  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com