275 कॅरेट टोमॅटोची किंमत फक्त 'इतकी'च?...पावत्या बघून शेतकरीही हैराण!

रोशन भामरे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

तळवाडे दिगर येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून कवडीमोल भावात टोमॅटो विक्री करुन नुसत्याच कोऱ्या पावत्या हातात पडत आहेत. मालाची काढणी करून क्रेट्‌स भरण्यासाठीचा खर्चही आपल्या खिशातून भरण्याची वेळ आली आहे. सर्वच भाजीपाला पिकांची हीच परिस्थिती दिसत असून कोरोनाने शेतकऱ्यांला पुरते हैराण केल्याचे चित्र चित्र दिसतंय...

नाशिक : (तळवाडे दिगर) येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून कवडीमोल भावात टोमॅटो विक्री करुन नुसत्याच कोऱ्या पावत्या हातात पडत आहेत. मालाची काढणी करून कॅरेट भरण्यासाठीचा खर्चही आपल्या खिशातून भरण्याची वेळ आली आहे. सर्वच भाजीपाला पिकांची हीच परिस्थिती दिसत असून कोरोनाने शेतकऱ्यांला पुरते हैराण केल्याचे चित्र दिसतंय...

हातात कोऱ्या पावत्याच

एका शेतकऱ्याने 275 (जाळी) कॅरेट टोमॅटो सुरत येथे पाठवला असता, त्या मालास 50 रुपये प्रतिक्रेट्‌स भाव मिळाला. त्याचे एकूण 15 हजार 125 रुपये मिळाले. त्यातून वाहतूक खर्च 14 हजार 25 रुपये काढून अवघे एक हजार 100 रुपये हातात पडले आहेत. सुरत येथे पाठविण्यासाठी प्रतिक्रेट्‌स 51 रुपये भाडे लागते. हमाली, तोलाईचा खर्च बाजार समिती करीत असली, तरीही खिशातून पैसे टाकून माल पाठविण्याची वेळ लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांवर आली आहे. एकरी एक ते दीड लाख खर्च केलेल्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर ट्रॅक्‍टर फिरवायला सुरवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात शेळ्या, मेंढ्या सोडायला सुरवात केली आहे. टोमॅटोसाठी शेतीची मशागत, ठिबक, मल्चिंग पेपर, खत, औषध, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, बांधणी, तोडणी (काढणी) मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाखो रुपये खर्च करूनही हातात कोऱ्या पावत्या पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

सर्व भाजीपाला पिकांची हीच परिस्थिती 

उन्हाळ्यात दरवर्षी भाजीपाल्यांचे दर वाढतात; मात्र यंदा सर्व भाजीपाला पिकांची हीच परिस्थिती असून, मिरची, कांदा, कोबी, फ्लॉवर, टरबूज, काकडी आदी पिकांनाही कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघणे अशक्‍य झाले आहे. 

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई

सध्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असून, टोमॅटो मार्केटपर्यंत नेण्याचा वाहतूक खर्चसुद्धा निघत नसून एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च करून पीक सोडून देण्याची वेळ आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली असून, हीच परिस्थिती सर्वच भाजीपाला पिकांची झाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक घ्यावे तरी कशाचे आणि जगावं तरी कसं, असा प्रश्‍न पडला आहे. - दीपक भामरे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, तळवाडे दिगर

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 275 crates of tomatoes cost just Rs 1,100, farmers are at a loss nashik marathi news