नाशिक शहरात ४० टक्के हर्ड इम्युनिटी विकसित; सिरो सर्वेक्षण पाहणी अहवालातील माहिती 

विक्रांत मते
Tuesday, 26 January 2021

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किती लोकांमध्ये कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज विकसित झाल्या, याचे सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे झाले.

नाशिक : शहरात किती लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली, हे तपासण्यासाठी केलेल्या सिरो सर्वेक्षणाचा अहवालाचा निष्कर्ष वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला असून, लोकसंख्येची घनता असलेल्या झोपडपट्टी भागात ४० टक्के, तर मध्यमवर्गीय उच्चभ्रू भागात ३९ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज आढळल्या आहेत. ३९.९५ टक्के पुरुष, तर ३९.१३ टक्के पुरुषांमध्ये ॲंटिबॉडीचे प्रमाण आहे. 

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किती लोकांमध्ये कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज विकसित झाल्या, याचे सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. के. वाय. येळीकर व डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सिरो सर्वेक्षण झाले. शहराच्या विविध भागांतील १८ वर्षांवरील दोन हजार ३५२ नागरिकांचे रक्ताचे नमुने संकलित केले. त्यातील ९९६ (४२.२९ टक्के) नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केलेल्या ५१७ संशयितांपैकी १७० लोक तपासणीत पॉझिटिव्ह आढळले होते. १७० पैकी फक्त १०५ व्यक्तींमध्ये अँटिबॉडीज आढळून आल्या. १३४ लोकांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह असल्या, तरी त्यांच्यात अँटिबॉडीज आढळून आल्या. शहरात कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीजचे प्रमाण ३९.५० टक्के आढळले. झोपडपट्टी भागात ४२.०७, तर बिगरझोपडपट्टी भागात हेच प्रमाण ३८.१२ टक्के आढळून आले. रक्तनमुन्यांमध्ये अँटिबॉडीज आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये ७८.८१ टक्के व्यक्ती अशा आहेत, की कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याचे आढळून आले नाही. १५ टक्के व्यक्ती कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्या. ज्या व्यक्तींचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले, त्यातील ३६.९९ टक्के लोकांना हृदयविकार, ३५.४५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब, ३४.०४ टक्के लोकांना मधुमेह, ३९.८३ टक्के लोकांना कुठलाच आजार नव्हता. २८.०७ टक्के लोकांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक आजार आढळून आले. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

असे आहे अँटिबॉडीजचे प्रमाण (टक्केवारीत) 

-सिडको विभाग : ४२. ६६. 
-पूर्व विभाग : ४२.०७. 
-नाशिक रोड, सातपूर, पश्‍चिम व पंचवटी : ३४ ते ३९. 
-झोपडपट्टी भाग : ३१ ते ४० वयोगटात ४५.०८. 
-बिगर झोपडपट्टी भाग : ६१ ते ७० वयोगटात ४४.५७. 

धर्मानुसार अँटिबॉडीजचे प्रमाण (टक्केवारीत) 

-मुस्लिम : ५२ 
-हिंदू : ३८.६८ 
-बौद्ध : ४३.४१ 
-इतर धर्म : ५१.६१ 

व्यवसायनिहाय अँटिबॉडीजचे प्रमाण (टक्केवारीत) 

-अकुशल कामगार : ४५.२१. 
-बौद्धिक वर्ग : ३१.६७. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच
 

सिरो सर्वेक्षणात कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज ४० टक्के नागरिकांमध्ये विकसित झाल्या आहेत. हे प्रमाण समाधानकारक असले, तरी कोरोनासंदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 percent herd immunity developed in Nashik city Marathi news