भामट्याला अफरातफरीत बायकोचीही होती साथ; पण एक चूक अन् प्लॅन फसला

अंबादास शिंदे
Friday, 15 January 2021

सदर संशयित हा काही महिन्यापूर्वी जेलरोड येथे राहत होता. त्याने सुरवातीला परिसरातील नागरिकांची ओळख करून घेतली व विश्वास संपादन केला. तसेच विविध सोनारांच्या दुकानांमधून रोख सोने खरेदी करून त्यांचाही विश्वास संपादन केला.

नाशिक रोड : दिनेश हा काही महिन्यांपासून बायको अन् मुलांसोबत जेलरोड येथे राहत होता. अनेकांचा विश्वास संपादन करुन त्याने वेगवेगळे कारनामे देखील केले. या कामात त्याला पत्नीनेही साथ दिली. अन् एक दिवस बोरीया बिस्तर बांधून त्याने ठोकली धूम. मात्र एक दाखल्याने त्याचे पितळ उघडे. वाचा नेमके काय घडले?

असा आहे प्रकार

सुमारे ४५ लाखांची फसवणूक करणाऱ्यास उपनगर पोलिसांनी उत्तरप्रदेश येथील मथुरा येथून अटक केली आहे. दिनेश कुमार रामाधर मित्रा, असे संशयिताचे नाव आहे. सदर संशयित हा काही महिन्यापूर्वी जेलरोड येथे राहत होता. त्याने सुरवातीला परिसरातील नागरिकांची ओळख करून घेतली व विश्वास संपादन केला. तसेच विविध सोनारांच्या दुकानांमधून रोख सोने खरेदी करून त्यांचाही विश्वास संपादन केला. तसेच अख्तर मुजिर मोडल या व्यक्तीबरोबर ओळख करून सोने घडविण्याचे तुला काम देतो, असे आमिष दाखवून ४३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पाच लाख घेतले. त्याप्रमाणे अष्टेकर ज्वेलर्स येथून ११८ ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन नंतर पैसे देतो, असे सांगितले. त्याचप्रमाणे अनेक बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळले. त्याला पत्नी माधुरी मिश्रा हिने साथ दिली. त्यानंतर मोबाईल, बँक खाते बंद करून तसेच मुलाच्या शाळेचे दाखले घेऊन सदर व्यक्ती हा पसार झाला. 

सुमारे २७,९०,००० ऐवज जप्त

उपनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. उपनगर पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपीचे मुले हे गुजरातमध्ये शिकत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी गुजरात गाठले. त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने पळ काढला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा मोबाईल नंबर मिळवत मथुरा शहर गाठले. मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडून पंधरा लाख किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम ८,४०,००० व त्याच्या बँकेच्या खात्यात असलेले ४,५०,००० रक्कम गोठविले. असा सुमारे २७,९०,००० जप्त करण्यात आले आहे. 

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या आदेशानुसार उपायुक्त विजय खरात, सहय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, उपनिरीक्षक विकास लोंढे, हवालदार विनोद लखन, नीलेश जगताप, नसीर शेख आदींनी ही कामगिरी केली. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 lakh from a goldsmith Fraudster arrested nashik marathi news