Covid19 : अनेकांच्या लग्नाच्या बस्त्याचे केंद्र ठप्प.. ६०० कोटींचे चलन "ब्रेकडाउन'

paithani yeola.jpg
paithani yeola.jpg

कोरोनामुळे 600 कोटींचे चलन "ब्रेकडाउन' 
पैठणी, टोपी, साडीसह हॉटेल, लान्स, छोट्या व्यावसायिकांचे मोडले आर्थिक कंबरडे 

नाशिक / येवला : दुष्काळी येवला तालुक्‍यात शेतीला जोडून अनेक छोटे-मोठे व्यवसाय आहेत. यावरच येथील अर्थकारण तग धरून आहे. कोरोनामुळे दोन महिने घरात बसण्याची वेळ आल्याने सुमारे पाचशे ते सहाशे कोटींचे चलन पूर्णत: ठप्प झाले आहे. अनेक व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असून, आता पुन्हा कशी उभारी घ्यावी, अशी चिंता प्रत्येकाला सतावत आहे. 

अनेकांच्या लग्नाच्या बस्त्याचे केंद्र ठप्प
येथील शेती आठमाही बागायती, तर इतर चार महिने 10 ते 20 टक्के शेतातच पिके दिसतात. त्यामुळे अनेकांना आधार घ्यावा लागतो तो व्यवसायाचा. हे तर पैठणीचे माहेरघर. नगर, नाशिक, मराठवाडा अन्‌ खानदेशमधील अनेकांच्या लग्नाच्या बस्त्याचे केंद्र बनले आहे. त्यामुळे पैठणी आणि कापड बाजाराचे दोनशे कोटींच्या वर चलन ठप्प झाल्याचा अंदाज आहे. येथील गांधी टोपी राज्यभर प्रसिद्ध. थेट नागपूरपर्यंत येवल्याची टोपी पोचते. मात्र, लॉकडाउनमुळे टोपी व उपरण्यांची निर्मिती आणि विक्रीही ठप्प झाली. येथील मुस्लिम व्यावसायिक यंत्रमागावर विणकाम करतात. त्यांचेही माग बंद होऊन लाखोंचा चुना त्यांना लागला आहे. 


आता खेड्यातील लग्नेही येवल्यात लॉन्सवर होऊ लागली आहेत. एका लग्नाचा सुमारे पाच लाख सरासरी खर्च धरला, तरी वर्षभरातील दीडशे ते दोनशे विवाह समारंभांचा लॉन्स, किराणा, बॅन्जो, भाजीपाला, केटरर्स, डेकोरेटर्स, फुलकाम करणारे, घोडेवाले, बॅन्डवाले, फोटो-व्हिडिओग्राफर, पार्लर, आचारी, वाहतूक, फर्निचरसह अवलंबून व्यावसायिकांचा सुमारे 10 ते 15 कोटींचा व्यवसाय बुडाला आहे. येथील बाजार समितीत कांद्याची मोठी उलाढाल असते. मात्र, भाव पडले व लिलाव बंद झाले आणि मागणीही घटल्याने प्रचंड नुकसान शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे झाले आहे. 

तब्बल पन्नासवर हॉटेलांचा व्यवसाय ठप्प

येथे सुमारे 20-25 शिक्षण संस्था असून, शिकण्यासाठी दहा ते बारा हजार विद्यार्थी येतात. या सर्वांशी निगडित पूर्ण व्यवहार ठप्प आहेत. तालुक्‍यातील 250 ते 300 बेरोजगार ट्रॅव्हलिंगसह चारचाकी वाहने घेऊन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्याशी संबंधित लाखो रुपयांचे चलन ठप्प झाले असून, येथील एसटी आगाराला रोज पाच लाखांची झळ बसत आहे. येवल्यातील मंगळवारचा आठवडेबाजार लाखमोलाचा असतो. शिवाय 40 ते 50 गावांतही मोठे बाजार भरतात. हे आठवडेबाजार ठप्प झाल्याने छोट्या व्यावसायिकांच्या खिशाला होल पडल्याची स्थिती आहे. येथील बाजारपेठेत दुचाकी विक्रीसह इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फर्निचर, चिकन, मटणाची मोठी उलाढाल होते. त्यांच्यासह नगर-मनमाड व नाशिक-औरंगाबाद दोन महामार्ग गेल्याने तब्बल पन्नासवर हॉटेलांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. 

यांना बसली झळ 
बाजार समिती- 1, उपबाजार- 2 
उत्पादक कंपन्या- 3 
बसस्थानक- 1 
भाजी बाजार- 1 
आठवडेबाजार- 50 
पैठणी शोरूम- 6 
पैठणी विक्रेते- 140 ते 160 
कापड दुकाने- 70 
साडी दुकाने- 55 
गांधी टोपीचे होलसेल- 6 
ट्रॅक्‍टर शोरूम- 7 
दुचाकी शो रूम- 7 
चारचाकी शोरूम- 2 
शिक्षणसंस्था- 28 
सलूनचालक- 450 
किराणा मॉल- 3 
किराणा दुकाने- 600 ते 700 
हॉस्पिटल, क्‍लिनिक- 11- 125 
इतर व्यावसायिक- 4-5 हजारांवर 
मटण-चिकन विक्रेते- 50 
हॉटेल्स, लॉजिंग- 60 
हार्डवेअर, ऑटोमोबाईल- 50 ते 60 
मोबाईल शॉपी- 125 
शेती साहित्य- 80 वर 

(आकडेवारी येवला शहर व तालुक्‍यातील .) 
 
कोविडच्या वैश्‍विक महामारीने शारीरिक, मानसिक संपत्ती बळावून अर्थकारण चुकविले आहे. येवल्यातील सर्वच उद्योग-व्यवसाय रसातळाला गेल्याने सर्वच गणिते बिघडली. आमची निर्यातही ठप्प झाली. आता एक-दुसऱ्याला मदत करण्याचा मंत्र जपला, तर उद्‌भवलेल्या परिस्थितीवर मात करू. -सम्राट वर्मा, संचालक, कृष्णा एंजिटेक, येवला 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

सलग 50-55 दिवस व्यवसायाला कुलूप लागल्याने अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. काही व्यावसायिक पुन्हा जोमाने उभे राहतील. मात्र, अस्तित्वच हिरावले गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com