६२३ हेक्टर जमिनी वैतरणा धरणग्रस्तांना मिळणार परत; आमदारांच्या पाठपुराव्याला यश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

प्रश्‍नी आमदार खोसकर यांनी जलसंपदामंत्री श्री. पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच, श्री. पाटील यांनीही संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते.

इगतपुरी (नाशिक) : तालुक्यातील अप्पर वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी वापराविना पडून असलेली ६२३ हेक्टर अतिरिक्त जमीन स्थानिक मूळ मालक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत याबाबत बैठक झाली. 

आमदार खोसकर यांच्या पाठपुराव्याला यश 

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील या प्रलंबित विषयावर चर्चा झाली. त्यानुसार प्रामुख्याने वैतरणा धरणासाठी ६२३ हेक्टर अतिरिक्त संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्यास नियामक मंडळाने मान्यता दिली. याप्रश्‍नी आमदार खोसकर यांनी जलसंपदामंत्री श्री. पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच, श्री. पाटील यांनीही संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आता हा प्रश्‍न मार्गी लागल्याने या सर्व शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे, अशी भावना आमदार खोसकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, वैतरणा धरणासाठी संपादित झालेल्या जमिनींपैकी वापरात नसलेली एकूण ६२३ हेक्टर जमीन ही परिसरातील १५ गावांमधील असून, ती आतापर्यंत शासनाच्या नावावर होती. 

नागोसली ग्रामपंचायत, अंगणवाडीलाही मिळणार जागा 

या ६२३ हेक्टरपैकी १.४८ एकर जागा अंगणवाडी व इतर कामांकरिता विनामूल्य हस्तांतरणालाही परवानगी देण्यात आली आहे. यात नागोसली ग्रामपंचायतीकरिता १.४८ एकर जमिनीस मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ६२२ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग यामुळे आता मोकळा झालेला आहे. 

हेही वाचा>  दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

गेल्या काही वर्षांपासून वैतरणा धरणातील वापराविना असलेल्या अतिरिक्त जमिनी प्रकल्पग्रस्त मूळ मालकांना परत मिळाव्यात, अशी मागणी मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीमुळे हा प्रश्‍न लवकर निकाली निघाला. यामुळे मूळ मालक शेतकऱ्यांना समाधान मिळणार आहे. - हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर  

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 623 hectares land Vaitarna dam victims will get back nashik marathi news