६५ ग्रामपंचायतींसाठी अवघा साडेसहा लाखांचा निधी; उधारीवरच निवडणुका करण्याची प्रशासनावर वेळ

दिपक आहिरे
Wednesday, 13 January 2021

निफाड तालुक्यातील ६५ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ६० ग्रामपंचायतींचा रणसंग्राम रंगला आहे. ५० हजार रुपये प्रतिग्रामपंचायतप्रमाणे निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्य व इतर खर्चासाठी ३५ लाख रुपये ग्रामविकास विभागाकडून येणे अपेक्षित होते.

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोरोनामुळे राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीवर झाला असून, ग्रामविकास विभागाने हात आखडता घेतला आहे. निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक खर्चासाठी प्रशासनाने प्रतिग्रामपंचायत ४९ हजारांची मागणी केली होती. मात्र प्रतिग्रामपंचायत अवघा दहा हजार रुपये निधी मिळाला आहे. सहा लाखांत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लागणारे स्टेशनरी, बसभाडे व इतर खर्च भागविताना प्रशासनाची दमछाक सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुका उधारीवरच करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 

ग्रामविकास विभागाकडून निधीला कात्री
 
निफाड तालुक्यातील ६५ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ६० ग्रामपंचायतींचा रणसंग्राम रंगला आहे. ५० हजार रुपये प्रतिग्रामपंचायतप्रमाणे निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्य व इतर खर्चासाठी ३५ लाख रुपये ग्रामविकास विभागाकडून येणे अपेक्षित होते. निवडणूक विभागाकडे तसा प्रस्तावरही सादर केला होता. पण अवघे सहा लाख रुपये प्राप्त झाले. यातील बहुतांश निधी खर्च झाला आहे. अत्यल्प निधीतून खर्च कसा करावा, याची चिंता सतावत आहे. 

हेही वाचा >  संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

निवडणूक उधारीवर घेण्याची वेळ 

कोरोनाने उत्पन्न घटल्याने ग्रामविकास विभागाकडून निधीला कात्री लागली आहे. त्यामुळे निधी वाटपाला कुचराई केली जात असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. निधीचा पुढचा टप्पा येत नाही तोपर्यंत निवडणूक उधारीवर घेण्याची वेळ आली आहे. बस, वाहन, पेट्रोल, डिझेल, स्टेशनरी यांसह इतर वस्तूंची देयके देण्यास अडचणी येत आहेत. तहसील कार्यालयातून मतदान केंद्रांवर मशिन, निवडणुकीचे साहित्य रवाना करण्यात येणार आहे. यासाठी बसची गरज असल्याने बुकिंग करावी लागेल. एसटी महामंडळाला निधी दिल्यानंतर बस दिल्या जातील. त्यामुळे हा प्रश्‍न उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For 65 Gram Panchayats in Niphad A fund of only six and a half lakhs nashik political news