बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

gift2.jpg
gift2.jpg

मालेगाव कॅम्प (नाशिक) : लग्नसराई म्हटली, की अगदीच धामधूम असते. आपल्याकडचे लग्न धूमधडाक्यात कसे होईल, याकडे कल वाढला आहे. असे असताना अनेक कुटुंबे सामाजिक बांधिलकीलाही तितकेच महत्त्व देतात. सामाजिक बांधिलकीचे एक उदाहरण पठाडे कुटुंबीयांनी ठेवले आहे. 

बडेजावाला फाटा देत पठाडे कुटुंबीयांकडून आदर्श 

कसमादे भागात विवाहानिमित्त मांडवाला खूप महत्त्व आहे. मांडवामागची जुन्या लोकांची भावना वेगळी आहे. सध्या हायटेक काळात मांडवाला खूप महत्त्व आले आहे. कसमादे पट्ट्यात मांडवाला उपस्थितीही महत्त्वपूर्ण मानली जाते. घरावर जांभूळ, आंब्याच्या पानांचे डगळे टाकतात. अलीकडे झाडांची घटती संख्या लक्षात घेता जांभूळ, आंब्यांची झाडे कमी झाल्याने मांडवाला पाने देण्यास शेतकरी नाखूश असतात. यावर पर्याय म्हणून येथील चर्चगेट भागातील डॉ. अरुण पठाडे या डॉक्टरांनी कनिष्ठ भगिनी कुणाक्षी हिच्या लग्नाच्या मांडवातील उपस्थितांना बेलवृक्षाच्या रोपाचे दान करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. जवळपास १११ बेलाची रोपे डॉ. पठाडे यांनी या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगरसेवक सुनील गायकवाड, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भिकन शेळके, अशोक शिंदे, सुभाष पाटील, डॉ. राजेंद्र ठाकरे, वाय. के. खैरनार, रोटरीचे राजेंद्र भामरे, दिलीप ठाकरे, अमित खरे, विजेंद्र शर्मा आदी उपस्थित होते. 

रुसव्याफुगव्याला फाटा 

ग्रामीण भागासह शहरातही मांडवाला येणाऱ्या पाहुण्यांसह वऱ्हाडी मंडळीला टोपी, उपरणे, शाल-पागोटे देऊन सन्मानित करतात. या भानगडीत जवळचाच नजरचुकीने सुटला, तर लग्नघरच्या मंडळींची भंबेरी उडते. समजदार पाहुणा असेल, तर ठीक नाही तर ऐन लग्नात रुसवाफुगवा सुरू होतो. त्यामुळे अशा सामाजिक दायित्वाची गरज या वेळी उपस्थितांनी बोलून दाखवली. 

नव्या पिढीला मांडव प्रथा हा उत्सव वाटतो. मात्र या पाठीमागचा उद्देश समजणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण संवर्धनाची भूमिका व्यापक करून युवकांनी अशा पद्धतीने अनुकरण करण्याची गरज आहे. - डॉ. अरुण पठाडे. सचिव, रोटरी मालेगाव फोर्ट  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com