नाशिकच्या बस धावणार मुंबईला! बेस्टच्या मदतीसाठी ७० बस तयार; मात्र कर्मचाऱ्यांत नाराजी

विनोद बेदरकर
Sunday, 27 September 2020

सूत्रांच्या माहितीनुसार राज्यभरातून एक हजार बस मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मात्र मुंबईत पोचलेल्या कर्मचाऱ्यांना किमान सुविधा मिळत नसल्याने संताप आहे. अशात सेवेला नकरा देणाऱ्या जिल्ह्यातील किमान २५ कर्मचाऱ्यांना अशा नोटिसा बजावल्याने कर्मचारी आणि प्रशासनात धुम्मस सुरू आहे. 

नाशिक : रेल्वेची उपनगरीय सेवा बंद असल्याने मुंबईतील प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्टला राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मदतीचा हात दिला असून, मुंबईशेजारील जिल्ह्यांतून बस आणि कर्मचारी मुंबईला पाठविले जात आहेत. मुंबईत बेस्टसाठी सेवा बजावण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाने थेट निलंबन कारवाईचा धडका सुरू केल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. 

कर्मचारी आणि प्रशासनात धुम्मस सुरू

राज्यात अनलॉक सुरू झाला असला तरी अद्याप वाहतूकव्यवस्था पूर्ववत झालेली नाही. मुंबईतील वाहिनी असलेली उपनगरीय सेवा सामन्यांसाठी बंद आहे. त्यामुळे मुंबईत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्टवर ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईजवळील नाशिक, पालघर, रायगड, तसेच पुणे येथील बस बेस्टच्या मदतीला बोलविण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यभरातून एक हजार बस मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मात्र मुंबईत पोचलेल्या कर्मचाऱ्यांना किमान सुविधा मिळत नसल्याने संताप आहे. अशात सेवेला नकरा देणाऱ्या जिल्ह्यातील किमान २५ कर्मचाऱ्यांना अशा नोटिसा बजावल्याने कर्मचारी आणि प्रशासनात धुम्मस सुरू आहे. 

नाशिकहून ७० बस 

नाशिक विभागातून ७० बस, तर १४० वाहक आणि तेवढेच चालक मुंबईत पोचले आहेत. मागणी मोठी असल्याने नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. इगतपुरी व सिन्नर डेपोतील किमान २५ जणांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

सुविधांचा मात्र वानवा 

मुंबईत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यास मात्र टाळाटाळ होत असल्याने संताप आहे. एस.टी. कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. त्यातच हॉटस्पॉट ठिकाणी गेल्यानंतर किमान दोन वेळ जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था अपेक्षित आहे. परंतु प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची परवड सुरू आहे. पण सेवेला नकार देणाऱ्यांवर महामंडळाने थेट कारवाईचा बडगा उगारल्याने कर्मचारी संतप्त आहेत. मुंबईत किमान एक हजार बसची आवश्यकता असून, सुविधा नसतील तर उद्रेकाची शक्यता नाकारता येणार नाही.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 buses from Nashik to help BEST in Mumbai nashik marathi news