शहरात कोरोनारुग्ण शोधासाठी ८०० पथकांची नियुक्ती ; इतरही आजारांची घेणार माहिती

विक्रांत मते
Wednesday, 23 September 2020

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत शहरात २५ ऑक्टोबरला सर्व घरांना भेटी देऊन गंभीर आजारांचे रुग्ण शोधले जाणार असून, त्यासाठी ८०० पथकांची नियुक्त केली जाणार आहे.

नाशिक : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत शहरात २५ ऑक्टोबरला सर्व घरांना भेटी देऊन गंभीर आजारांचे रुग्ण शोधले जाणार असून, त्यासाठी ८०० पथकांची नियुक्त केली जाणार आहे. साडेचार लाख घरांमधील १९ लाख लोकांपर्यंत पथके पोचून तपासणी करणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 

१५ सप्टेंबरपासून तपासणी मोहीम सुरू

कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना या आजारावर अद्यापही लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी. या उद्देशाने राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. महापालिका हद्दीत १५ सप्टेंबरपासून तपासणी मोहीम सुरू झाली असून, २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत दोन टप्प्यांत अभियान राबविले जाणार आहे. यात घरोघरी भेटी देऊन ‘सारी’ व ‘इली’ या आजारासोबत इतर रुग्ण शोधले जाणार आहेत. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा आदी आजारांबाबत माहिती घेतली जाणार आहे. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

सहा विभागांत घरोघरी तपासणी 

पूर्व विभागातील सहा यूपीसीएस सेंटरमधील १५२ पथकांच्या माध्यमातून ८३ हजार ६०१ घरांमधील तीन लाख ६१ हजार ६६ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. पश्चिम विभागातील चार यूपीसीएस सेंटरमधील १०५ पथकांच्या माध्यमातून ५१ हजार ३१२ घरांमधील दोन लाख ३२ हजार ४९९ नागरिकांची तपासणी होईल. पंचवटीमधील पाच यूपीसीएस सेंटरमधील ९९ पथकांच्या माध्यमातून ५६ हजार ७४९ घरांमधील दोन लाख ६४ हजार २५६ नागरिकांची तपासणी होईल. नाशिक रोड विभागातील पाच यूपीसीएस सेंटरमध्ये १४३ पथके ६० हजार ७४३ घरांमधील तीन लाख दहा हजार ७४० नागरिकांची तपासणी करतील. सिडको विभागातील सहा यूपीसीएस सेंटरमध्ये १५४ पथके एक लाख पाच हजार ८५० घरांमधील चार लाख २४ हजार ७७० नागरिकांची तपासणी करतील. सातपूर विभागात चार यूपीसीएस सेंटरमधील १४१ पथके ८२ हजार ३०३ घरांमधील तीन लाख आठ हजार ३६२ नागरिकांची तपासणी करतील. अशा एकूण शहरातील चार लाख ४० हजार ५५८ घरांमधील १९ लाख १६ हजार ९३ नागरिकांची ७९४ पथकांच्या माध्यमातून तपासणी होईल. पथकाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 800 teams to search for corona patients in nashik marathi news