शेतकरी हतबल! बुरशी वाढल्याने ६० टक्के कांदे वाफ्यातच मृत; पीक जगवताना आटापिटा

onion plant.jpg
onion plant.jpg

नाशिक : (येवला) कांद्याचे रोप मिळत नसताना ते मिळवून त्याची लागवड केल्यानंतरही जमिनीतील बुरशीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आठवड्याच्या आत ५० ते ७० टक्के कांदे वाफ्यातच मृत होत असल्याने रोपे वाचविताना शेतकरी हतबल होत आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट 

विचित्र हवमान, सततचा पडणारा पाऊस यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने हजारो एकरात कांद्याची मर होत असल्याने पोळ, रांगडे रोप व कांद्याची लागवड जगवताना शेतकरी हतबल झाला आहे. दुपारी कडक ऊन, सायंकाळी धो-धो पाऊस, त्यात सीड्स कंपन्यांचे कांदा बियाणे यामुळे टाकलेली लाल पोळ, रांगड्या खरीप कांद्याची रोपे व झालेली पोळ कांद्याची लागवड यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. रोप व लागवड झालेला कांदा अज्ञात रोगाने अचानक पिवळा पडून कांदा रोपाला गोलाकार आळेपिळे पडून दोन-तीन दिवसांत तो पूर्णपणे सडून जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. 

तिन्ही हंगाम वाया जाणार असल्याची भीती

हजारोंची वेगवेगळ्या प्रकारची औषधे फवारूनही पिकांमध्ये सुधारणा दिसत नसून या वर्षी पोळ कांद्याचे रोप पूर्णपणे सडले असून, दहा पायलीच्या बियाण्यांच्या रोपात एक एकरसुद्धा लागण झालेली नाही हे वास्तव असताना गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी फक्त पाच ते दहा टक्के पोळ कांदा लागवड राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे. रांगडा कांद्याचे लावणीला आलेले रोपही मोठ्या प्रमाणात खराब होत असून, उन्हाळ (गावठी) कांद्याचे रोप पावसामुळे टाकता येत नसल्याने उन्हाळ रोप टाकण्याचा अवधीही उलटून चालत असल्याने कांद्याचे तिन्ही हंगाम वाया जाणार असल्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यवत करत आहे. 

पीक जगवताना आटापिटा 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून गेल्या वर्षीच्या कांद्याच्या चढ्या बाजारभावामुळे डोंगळे लावण्याकडे दुर्लक्ष झाल्याने या वर्षाच्या खरीप व रब्बी उन्हाळ अशा तीनही प्रकारच्या कांदा बियाण्यांचा प्रश्‍न उद्भवला. यामुळे शेतकऱ्यास नाइलाजास्तव सीड्स कंपन्यांची बियाणे घ्यावे लागली. सुरवातीला दोन ते अडीच हजार रुपये किलोने (आठ ते दहा हजार पायली) तर मागणी वाढल्याने आज तीन ते चार हजार रुपये किलोने (१२ ते १६ हजार रुपये पायली) घ्यावे लागत आहे. कांद्यावर या वर्षी आलेले रोग व नुकसान पाहता कांदा पैसे देणारे पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे बघत असल्याने मिळेल ती औषध वापरून कांदा जगवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वेळीच जर या रोगावर नियंत्रण मिळाले नाही, तर या वर्षी कांदा उत्पादनाचा नीचांक ठरेल. 

शेतकरी हजारो रुपये भांडवल गुंतवत असल्याने त्याचे भविष्यात मोठे नुकसान होणार असल्याची भीती आहे. त्यामुळे कांदा रोपावर व लागवडीवर आलेल्या रोगाविषयी शासनाने कृषी विभागाच्या संशोधकांमार्फत उपाययोजना शोधाव्यात. - उषा शिंदे, सभापती, बाजार समिती, येवला 

अज्ञात रोगामुळे कांद्याची रोपवाटिका व लागवड यांचे ७५ टक्के नुकसान झाले आहे. शासनाने तलाठी स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. - रघुनाथ खैरनार, कांदा उत्पादक शेतकरी, सायगाव 

कांदा रोप वाफ्यातच मृत होत असल्याने कांद्यावरही कोरोनाने हल्ला केला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटामुळे लाखो रुपयांचा फटकाही बसणार असल्याने आम्ही हतबल झालो आहे. - भागूनाथ उशीर, खरेदी-विक्री संघ संचालक, येवला 

तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले असून, शेतात बुरशीचे प्रमाण वाढल्याने असे होत आहे. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या फवारणीचे दोन ते तीन प्रयोगही आम्ही केले. मात्र त्यात यश आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ‘एनएचआरडीएफ’ तसेच राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन मागवले आहे. - कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com