खरिपाचे क्षेत्र वाढले! मालेगाव तालुक्यात बाजरी कापणीला वेग; चांगल्या पावसाचा फायदा

प्रमोद सावंत
Monday, 14 September 2020

भुईमुगाचे क्षेत्र एक हजार १५४ वरून एक हजार ९०० हेक्टरपर्यंत वाढले आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ८२ हजार १९३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात मात्र ८९ हजार ९८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १०९ टक्के पेरणी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नात काही प्रमाणात का होईना वाढ होऊ शकेल. 

नाशिक : (मालेगाव) तालुक्यातील बहुतांशी भागात आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यातच अतिपावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची बाजरी कापणीची लगबग सुरू केली आहे. तालुक्यात सर्वत्र बाजरी कापणीला वेग आला असून, शेतमजुरांच्या हाताला काम मिळत आहे. 

चांगल्या पावसाने खरिपाचे क्षेत्र वाढले 

वरुणराजाच्या कृपेमुळे तालुक्यात सर्वत्र जूनपासून वेळोवेळी पाऊस होत गेला. त्यामुळे जूनअखेरपर्यंत ९० टक्के पेरण्या झाल्या होत्या. या वर्षी जवळपास ८९ हजार ९८४ हेक्टरवर खरिपाचे पीक घेण्यात आले. समाधानकारक पावसामुळे १०९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. मका, बाजरी, कापूस अशी खरिपाची पिके चांगल्या अवस्थेत आहेत. गेल्या रविवारी (ता. ६) काटवनमध्ये झालेल्या मुसळधारेमुळे शेकडो एकरांवरील मका व बाजरीचे नुकसान झाले. पावसाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच सरासरी ओलांडली. सर्वत्र सरासरीच्या दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी हाती आलेले पीक काढण्याचे काम शेतकरी करीत आहेत. बाजरी कापणीसाठी पुरुषांना तीनशे, तर महिलांना दोनशे रुपये रोज दिला जात आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होणार

तालुक्यात या वर्षी मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३३ हजार ७४९ हेक्टर होते. मात्र प्रत्यक्षात ४२ हजार ८७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे पीकही काढणीच्या अवस्थेत आहे. या वर्षी दसऱ्याच्या आधी नवा मका बाजारात उपलब्ध होऊ शकेल. तालुक्यात कापसाचे क्षेत्रही वाढले आहे. सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ७५१ आहे. प्रत्यक्षात २२ हजार १३३ हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. भुईमुगाचे क्षेत्र एक हजार १५४ वरून एक हजार ९०० हेक्टरपर्यंत वाढले आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ८२ हजार १९३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात मात्र ८९ हजार ९८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १०९ टक्के पेरणी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नात काही प्रमाणात का होईना वाढ होऊ शकेल. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accelerate millet harvest in Malegaon taluka, Good rains increased kharif area nashik marathi news