साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीला निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

प्रमोद दंडगव्हाळ
Monday, 4 January 2021

साईबाबांच्या दर्शनासाठी काही तरुण मुंबईवरून शिर्डीला दर्शनासाठी निघाले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तरुण मुलांसोबत घडलेल्या घटनेनंतर कुटुंबियांमध्ये व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिडको (नाशिक) : साईबाबांच्या दर्शनासाठी काही तरुण मुंबईवरून शिर्डीला दर्शनासाठी निघाले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तरुण मुलांसोबत घडलेल्या घटनेनंतर कुटुंबियांमध्ये व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच
विलेपार्ले, मुंबई येथून नीलेश नंदकिशोर धावडे (वय २२), सिद्धार्थ भगवान भालेराव (वय २२), वैजनाथ जालिंदर चव्हाण (वय २१), आशिष महादेव पाटोळे (वय १९) व अनिश अरुण वाकळे (वय १७) यांच्यासह अन्य काही मित्र शनिवारी (ता. २) मध्यरात्री पाऊणच्या सुमारास दुचाकीवरून शिर्डीकडे जात होते. यापैकी नीलेश आणि सिद्धार्थ एका दुचाकीवर (एचएच ०२, एफएच ०६१०), तर आशिष, अनिश व वैजनाथ हे अन्य दुचाकीद्वारे (एमएच ०२, एफडी ४२४८) जात होते. लेखानगर भागात उड्डाणपुलावर वैजनाथ यांच्या दुचाकीला एका गाडीचा धक्का लागल्याने दोघे खाली पडले. त्याचवेळी मागून येत असलेल्या ट्रकचा वेग नियंत्रित न झाल्याने चौघे या ट्रकखाली आले. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले होते. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही जणांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वैजनाथ, सिद्धार्थ व आशिष यांना मृत घोषित केले. तर अनिशवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

ट्रकचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईहून शिर्डीकडे जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला लेखानगर परिसरात उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून, एक तरुण गंभीर जखमी आहे. या प्रकरणी नीलेश धावडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक राकेश शेवाळे तपास करीत आहेत.

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Three Mumbai youth death nashik marathi news