हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

nikita acc.png
nikita acc.png

नाशिक/ सटाणा : आजारी असलेल्या चिमुकल्याच्या उपचारांसाठी दुचाकीवरून सटाणा शहराकडे येत असताना झालेल्या अपघातात अवघ्या अकरा महिन्यांच्या चिमुकल्याला जीवनदान देऊन मातेने मृत्यूला कवटाळले. ही हृदयद्रावक घटना आज सोमवार (ता.२४) रोजी दुपारी बारा वाजता शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर विंचुर-प्रकाशा राज्य महामार्गावरील तरसाळी फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

असा घडला धक्कादायक प्रकार...

गणेशपूर (ता.साक्री जि.धुळे) येथील गोरख आनंदसिंग ठाकरे (वय ३५) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या अकरा महिन्यांच्या 'आदी' या मुलाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याच्यावर सटाणा येथे खासगी रुग्णालयात चांगले उपचार करावेत या हेतूने गोरख ठाकरे यांनी वडील आनंदसिंग ठाकरे यांना रुग्णालयात वेटिंग नंबर लावण्यासाठी रविवार (ता.२३) दुपारी बसने सटाणा येथे पाठवले होते. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्वत: गोरख ठाकरे हे दुचाकीवरून पत्नी निकिता (वय ३०), मुलगा पार्थ (वय ४) व आदी (वय ११ महीने) यांना सोबत घेऊन सटाण्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास विंचुर-प्रकाशा राज्य महामार्गावर तरसाळी फाट्याजवळ दुचाकी येताच महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवर अकरा महिन्यांच्या आदिला कवेत घेऊन बसलेल्या निकिता यांचा अचानक तोल गेला आणि त्या थेट महामार्गावर जोरात पडल्या. याच वेळी गोरख यांचाही दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते सुद्धा जोरात पडले. या भीषण अपघातात निकिता यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

डोक्यातून रक्तप्रवाह वाहत असूनही बाळाची मिठी घट्ट होती..

त्यांच्या डोक्यातून रक्तप्रवाह वाहू लागला. मात्र, या परिस्थितीतही त्यांनी चिमुकल्या आदि ला घट्ट धरून त्याचा जीव वाचवला. गोरख यांच्या गुडघ्याला गंभीर मार लागल्याने त्यांनाही जागेवरून उठता येत नव्हते तर चार वर्षांच्या पार्थला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. अपघात घडल्यानंतर जखमी पत्नीला त्वरित उपचार मिळावेत यासाठी गोरख रडून विनवण्या करीत होते, मात्र ऐनवेळी मदत करण्यास कुणीही पुढे यायला तयार नव्हते. याचवेळी विरगाव येथे कामानिमित्त जात असलेले वन स्टॉप सेंटर समितीचे जिल्हा सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शाम बगडाणे यांनी घटनास्थळी जखमींची विचारपूस केली. बगडाणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता एका रिक्षाला थांबविले आणि जखमी निकिताला शहरातील डॉ.प्रकाश जगताप यांच्या रुग्णालयात हलविले. डॉ.जगताप यांनी निकिताला तपासले, परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकताच गोरख ठाकरे यांनी एकच हंबरडा फोडला. बगडाणे व सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर यांनी ठाकरे यांच्या नातेवाईकांना व संबंधितांना फोन करून घटनेची माहिती दिली. या हृदयद्रावक घटनेमुळे उपस्थितांना सुद्धा गहिवरून आले होते. सटाणा पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

सुनबाईचे हेच शेवटचे शब्द ठरले
गणेशपूर (ता.साक्री जि.धुळे) येथून सकाळी ९ वाजता दुचाकीवरून निघाल्यानंतर साडेअकरा वाजेच्या सुमारास गोरख ठाकरे हे ताहाराबाद येथे पोहोचले होते. यावेळी सटाणा येथे दवाखान्यात असलेल्या वडिलांनी त्यांना फोन केला असता सून निकिता यांनी आम्ही तुम्ही काळजी करू नका आम्ही अर्धा तासात पोहोचतो असे कळविले आणि त्यानंतर काही वेळातच अपघात झाला. सुनबाईचे हेच शेवटचे शब्द ठरल्याचे सासरे आनंदसिंग ठाकरे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com