esakal | हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

sugercane.jpg

दामोदर पवार यांनी दोन एकरात लागवड केलेल्या 86032 जातीच्या उसात फवारणीसाठी कोणते औषध मारू विचारले. त्यावर दुकानदाराच्या सल्ल्याने पवार यांनी ऊसाच्या शेतातील तणावर फवारणीसाठी त्यांच्याकडूनच वीडमार सुपर, ग्रामोझोन आणि ऍग्रो स्प्रेड ही औषधे घेतली. त्यानंतर 9 जुलै रोजी पवार यांनी उसाच्या शेतात या औषधांची फवारणी केली अन्...

हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (येवला) कधी कधी एखाद्याने दिलेला महत्वपूर्ण सल्ला कुणास फायदेशीर तर कुणास  ठरतो त्रासदायक...असाच एका शेतकऱ्याने, बि-बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदाराचा घेतलेला सल्ला शेतकऱ्यास चांगलाच महागात पडला. त्यामुळे या शेतकऱ्याला डोक्यावर हात मारण्याची वेळी आली तसेच भविष्यातील उत्पन्नावर देखील पाणी सोडावे लागले. वाचा नेमके काय घडले...

असा आहे प्रकार

आडगाव चोथवा (ता. येवला) येथील ऊस उत्पादक शेतकरी दामोदर पवार यांनी शहरातील एका हायटेक कृषी सेवा केंद्रातून काही बि- बियाणे आणि ओषधे खरेदी केली. यावेळी दामोदर पवार यांनी दोन एकरात लागवड केलेल्या 86032 जातीच्या उसात फवारणीसाठी कोणते औषध मारू विचारले. त्यावर दुकानदाराच्या सल्ल्याने पवार यांनी ऊसाच्या शेतातील तणावर फवारणीसाठी त्यांच्याकडूनच वीडमार सुपर, ग्रामोझोन आणि ऍग्रो स्प्रेड ही औषधे घेतली. त्यानंतर 9 जुलै रोजी पवार यांनी उसाच्या शेतात या औषधांची फवारणी केली. मात्र दुसऱ्या दिवसापासून त्याचा उस जळू लागला आणि अवघ्या दोन दिवसातच संपूर्ण ऊस जळून गेला. भर उन्हाळ्यात लागवड केलेला दोन एकरातील अडीच महिन्यांचा ऊस जळून गेल्याने श्री. पवार यांनी सदरचा संपूर्ण प्रकार दुकानदाराच्या निदर्शनास आणून देत जाब विचारला असता दुकानदाराने श्री. पवार यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संतप्त झालेल्या श्री. पवार यांनी संबंधित विक्रेता विरूद्ध तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत दुकानदार आणि कंपनीवरूद्ध नुकसान भरपाईची मागणी करत आमरण उपोषणाचा इशारा दिला.

...अन्यथा आमरण उपोषणाला बसणार

ऐन हंगामात मुख्य पिकाचे मोठे नुकसान झाल्याने तुमच्या परिवाराला मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात संबधीत दुकानदार आणि कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई भरून न मिळाल्यास कृषी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी तक्रारीच्या प्रति श्री. पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक यांना पाठविल्या आहेत. त्यामुळे यावर आता शासन, प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे दुकानदारांचा हायटेक सल्ला या शेतकऱ्यास चांगलाच महागात पडला.

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

शेतकऱ्यांना कीटकनाशकांसह खते, बी बियाण्याची तांत्रिक माहिती नसल्याने जवळपास अनेक शेतकरी विक्रेत्याने दिलेले औषधेच फवारणी करतात. आम्हीही या दुकानदारांच्या सल्ल्याने तणनाशक घेऊन फवारणी केली अन् दोनच दिवसांत ऊस जळाला. लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कृषि विभागाने आम्हांला भरपाई मिळवून द्यावी. अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहोत. - दामोदर पवार, आडगाव चोथवा

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

go to top