नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, दररोज अडीचशे ते तीनशे रुग्ण आढळत आहेत. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाकडून आकड्यांचा खेळ खेळला जात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह आमदारही फक्त निवेदने देऊन सूचना करत आहेत. प्रत्यक्षात फील्डवर कुठे काम दिसत नाही.

नाशिक : प्रत्यक्षात फील्डवर कुठे काम दिसत नाही...महापालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेणारे आता टीकेच्या मूडमध्ये आहेत... एकंदरीत शहराला वाढत्या कोरोनाच्या काळात वाऱ्यावर सोडले असून, महापौरांनी जागे होऊन प्रशासकीय राजवट संपविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी भाजप व आयुक्त राधाकृष्ण गमे यांना उद्देशून केली. 

नोडल ऑफिसर नावाला नियुक्त

महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह आमदारही फक्त निवेदने देऊन सूचना करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही प्रशासन ढिम्म आहे. सत्ताधारी भाजपला नाशिककरांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. आज इतके कोरोनामुक्त केले, तितक्या टेस्ट केल्या या आकड्याच्या खेळात प्रशासन रममाण आहे. या परिस्थितीत नाशिककरांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा नसल्याचे कारण देत रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जाते. तेथे रुग्णांचे बँक खाते रिकामे करून घेतल्यानंतरच घरी सोडले जाते. लेखापालांची नियुक्ती केल्याचा आयुक्त दावा करतात, परंतु हा निव्वळ फार्स आहे. हेल्थ पॉलिसी असूनही रुग्णांकडून ॲडव्हान्स भरून घेतला जातो. कागदावर एक व प्रत्यक्षात वसूल केलेले बिल यात तफावत आहे. महापालिकेने नियुक्त केलेले नोडल ऑफिसर नावाला नियुक्त केले आहेत. रुग्णालयांनी किती बिल वसूल केले याची आकडेवारी पाहण्यासाठीच त्यांची नियुक्ती आहे. प्रत्यक्षात कारवाईच होत नाही. 

बैठकीची मागणी करूनही दुर्लक्ष

महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे अनेकदा सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीची मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते. यावरून महापौरांचे प्रशासनावरचे नियंत्रण सुटल्याने प्रशासकीय राजवट सुरू झाल्याचे स्पष्ट होते. सत्ताधारी व प्रशासकीय राजवटीमध्ये सर्वसामान्य नाशिककर भरडला जात आहे. मालेगाव व धारावीत कोरोना नियंत्रणात येऊ शकतो नाशिकमध्ये का नाही, असा सवाल करताना श्री. बोरस्ते यांनी प्रशासकीय राजवट न संपल्यास शिवसेनेला रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा दिला. 

हेही वाचा > नाशिकमधील 'हा' परिसर ठरतोय आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट!

सत्ताधारी मूग गिळून गप्प 

कोरोनामुळे नाशिककरांच्या आरोग्याबरोबरच आर्थिक नुकसान होत असताना सत्ताधारी मूग गिळून बसले आहेत. भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड या महापालिकांनी व्हेंटिलेटर, खाटा, इंजेक्शनची खरेदी करून नागरिकांना स्वस्तात इलाज उपलब्ध करून दिले आहेत. या स्थितीत नाशिक महापालिकाही भव्य रुग्णालय उभारू शकते. शहरात इंजेक्शन उपलब्ध नाही, व्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावत आहेत. इतर कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना महापालिका अत्यावश्यक खरेदी का करत नाही? भाजप व प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला नागरिक वैतागले, त्यामुळे नगरसेवकांकडे तक्रारी येत आहेत. अधिकारी दाद देत नसल्याने प्रशासन किती ढिम्म झाले याचे उदाहरण आहे. तातडीने औषधे खरेदी करण्याची मागणी श्री. बोरस्ते यांनी केली.  

हेही वाचा > सामनगाव शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where did the Nashik adopters go? Question of Shiv Sena's Ajay Boraste nashik marathi news