नाशिक जिल्‍ह्यात ९१ दिवसानंतर कोरोना बाधित दोनशेच्‍या आत; बारा रूग्‍णांचा मृत्‍यू

अरुण मलाणी
Tuesday, 27 October 2020

यापूर्वी गेल्‍या २८ जुलैला जिल्‍हा रूग्‍णालयातर्फे जारी केलेल्‍या अहवालानुसार त्या दिवशी १६९ बाधित आढळून आले होते. त्‍यानंतर बाधितांची संख्या वाढत जाऊन काही दिवसांत तर एका दिवसातील वाढ दोन हजारांच्‍या पलीकडे गेली होती.

नाशिक : जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणार्या कोरोना बाधितांचा आलेख कमी होत आहे. मंगळवारी (ता.२७) तब्‍बल ९१ दिवसांनंतर जिल्‍ह्‍यात दिवसभरात आढळलेल्‍या बाधितांची संख्या दोनशेच्‍या आत राहिली. १७१ कोरोना बाधित आढळले असतांना, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांची संख्या ३८६ होती. बारा रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात ५ हजार ४६५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

ऑक्‍टोबर महिना दिलासादायक

यापूर्वी गेल्‍या २८ जुलैला जिल्‍हा रूग्‍णालयातर्फे जारी केलेल्‍या अहवालानुसार या दिवशी १६९ बाधित आढळून आले होते. त्‍यानंतर बाधितांची संख्या वाढत जाऊन काही दिवसांत तर एका दिवसातील वाढ दोन हजारांच्‍या पलीकडे गेली होती. परंतु ऑक्‍टोबर महिन्‍यात दिलासादायक स्‍थिती असून, नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या कमी होत चालली आहे. मंगळवारी (ता.२७) दिवसभरात १७१ रूग्‍णांचा अहवाल पॉझिटीव्‍ह आला आहे. यापैकी नाशिक शहरातील १२५, नाशिक ग्रामीणचे ३९, मालेगावचे पाच तर जिल्‍हाबाह्य दोन बाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या ३८६ रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २१९, नाशिक ग्रामीणचे १५७, तर जिल्‍हाबाह्य दहा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. बारा मृतांमध्ये नाशिक ग्रामीणचे आठ रूग्‍ण असून, नाशिक शहरातील दोन तर मालेगावच्‍या एका रूग्‍णाचा कोरोनामुळे उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

एकूण  ९२ हजार ४२७

यातून जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ९२ हजार ४२७ झाली असून, यापैकी ८५ हजार ३०७ रूग्‍णांनी कोरोनावर मात केलेलीआहे. १ हजार ६५५ रूग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. दरम्‍यान दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ६००, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५७, मालेगाव रूग्‍णालये चार, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात अकरा तर जिल्‍हा रूग्‍णालयात चार रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरा ९८५ अहवाल प्रलंबित होते, यापैकी ५५६ अहवाल प्रलंबित नाशिक ग्रामीण भागातील तर ३०८ रूग्‍ण नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after 91 days corona infected patients are within 200 Nashik marathi news