कांदा चोरीचे सत्र सुरुच! चाळीतील कांद्यावर पुन्हा चोरट्यांचा डल्ला; उत्पादक शेतकरी हैराण

मोठाभाऊ पगार
Thursday, 29 October 2020

वाखारवाडी ता.देवळा येथील बाजी  राव निकम यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले. भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील व आपल्याला भाववाढीचा फायदा होऊन दोन पैसे मिळतील या अपेक्षेने चाळीत कांदा साठवून ठेवला होता.

नाशिक/देवळा :  एका बाजूला कांदा खरेदी बंद तर दुसऱ्या बाजूला कांदा चोरीचे सत्र वाढल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. कसमादे पट्टयात व देवळा तालुक्यात कांदा चोरीच्या घटना वाढत असतांनाच मंगळवारी (ता.27) रोजी रात्री वाखारवाडी ता. देवळा येथे कांदा चोरी झाला. येथील शेतकरी बाजीराव देवबा निकम यांच्या कांदाचाळीतून 10 ते 15 क्विंटल कांद्यावर चोरांनी डल्ला मारल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

वाखारवाडी ता.देवळा येथील बाजी  राव निकम यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले. भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील व आपल्याला भाववाढीचा फायदा होऊन दोन पैसे मिळतील या अपेक्षेने निकम यांनी देवळा-मालेगाव रस्त्यालगत असलेल्या कर्ला नदीजवळील शेतातील (गट नं. 631 ) चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चाळीचे कुलूप व जाळी तोडून कांदाचाळीतुन 10 ते 15 क्विंटल कांदा लंपास केला. बुधवारी सकाळी निकम यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलिस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. तालुक्यात कांदा चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शासनाने साठवनुकीवर निर्बंध लागू केल्याने बाजारसमित्या बंद आहेत. यावर तोडगा काढत लवकरात लवकर कांदा खरेदी सुरु करावी व संबंधित चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

 

खरीप कांदा अतिवृष्टीने गेला तर उन्हाळी कांदाची अशी अवस्था होत असल्याने शेतकरी नाहक भरडला जात आहे. दिवसभर काम करून आता काय रात्रभर कांदाचाळी राखाव्या का? कांदाप्रश्न लवकर मिटणे आवश्यक आहे. - दादाजी भामरे, युवा शेतकरी, खुंटेवाडी ता.देवळा 
 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again the onion was stolen in nashik marathi news