आरटीओ कार्यालयाला पुन्हा एजंटचा विळखा; चिरीमिरीशिवाय कामेच होत नसल्याचा आरोप 

दत्ता जाधव
Thursday, 24 December 2020

कधीकाळी शिकाऊ परवाना काढण्यासाठीही एजंटची मदत घ्यावी लागत असे. त्यानंतर याखात्याने याबाबत सुटसुटीतपणा आणल्याने एजंटच्या मदतीशिवायही परवाना मिळणे सुलभ झाले. कालांतराने पुन्हा एजंटचे महत्त्व वाढल्याचे दिसून येते.

पंचवटी (नाशिक) : पेठ रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पुन्हा दललांचा विळखा पडला आहे. गाजावाजा करून केलेल्या ऑॅनलाइनच्या जमान्यातही एजंटचे वर्चस्व व महत्त्व अद्यापही टिकून असल्याचे दिसून येते. कामासाठी एकतर एजंट अन्यथा चिरमिरीशिवाय कामेच होत नसल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला. 

चिरमिरीशिवाय कामेच होत नसल्याचा अनुभव
माजी सनदी अधिकारी महेश झगडे राज्याच्या परिवहन आयुक्तपदी असताना त्यांनी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये एजंटमुक्त करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार नाशिकच्या कार्यालयातूनही काहीकाळ या एजंटचे उच्चाटन झाले होते. झगडे यांच्या पावित्र्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांसह नाशिकच्या कार्यालयातूनही काही काळ यावर्गाचे उच्चाटन झाले होते. राज्यातील आरटीओ कार्यालये एजंटमुक्त करण्याच्या या घोषणेची कार्यवाही नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी झाली हेती. मात्र झगडे सेवानिवृत्त होताच परिस्थिती पूर्वपदावर आली. या कार्यालयात मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याने प्रथमच या कार्यालयात येणारी व्यक्ती भांबावून जाते. याचाच फायदा एजंट घेत आहेत. येथील चौकशी कक्ष पूर्ण क्षमतेने चालविल्यास कामासाठी येणा-यांची धावाधाव कमी होऊ शकेल. कारण येथील मोठ्या प्रमाणावरील खिडक्या पाहून नेमक्या कोणत्या खिडकीत जावे याचे मार्गदर्शनच होत नाही. 

हेही वाचा - शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त

किरकोळ कामांसाठीही एजंटची मदत 
कधीकाळी शिकाऊ परवाना काढण्यासाठीही एजंटची मदत घ्यावी लागत असे. त्यानंतर याखात्याने याबाबत सुटसुटीतपणा आणल्याने एजंटच्या मदतीशिवायही परवाना मिळणे सुलभ झाले. कालांतराने पुन्हा एजंटचे महत्त्व वाढल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांना अजूनही एजंटशिवाय गेल्यास परवान्याशिवाय गाड्यांच्या पासिंगलाही विलंब होत असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला. ऑनलाइनमुळे कामाची प्रक्रिया सुटसुटीत झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात किरकोळ कामासाठी वेळ लागत असल्याच्या तक्रारी अनेकांनी ‘सकाळ'च्या प्रतिनिधीकडे केल्या. 

 

हेही वाचा - निनावी पत्रावरून पोलीसांनी लावला शोध, हाती लागली धक्कादायक माहिती

दोन महिन्यांपासून आरटीओ कार्यालयात माझी छोटा हत्ती गाडी पासिंगसाठी येत आहे. परंतु मला कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण सांगितले जाते, मात्र पासिंगसाठी लागणारे सर्व कागदपत्रे जमा करूनही माझ्या गाडीची पासिंग करून फिटनेस सर्टिफिकेट्स मिळत नाही. - विलास झोले, दुडगाव, ता. त्र्यंबकेश्‍वर 

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी मी २२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन प्रकियेद्वारे फी भरली आहे. तब्बल दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत लायसन्सचे काम झालेले नाही. याबाबतचा मोबाईलवरून आरटीओ कार्यालयाकडून फोनअथवा मेसेजही आलेला नाही. - विजय पाटील, उंटवाडी, नाशिक 

आरटीओ कार्यालयाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झालेली असून, कुठल्‍याही एजंटांची आवश्‍यकता राहिलेली नाही. नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता, संकेतस्‍थळावरून संपूर्ण प्रक्रिया राबवावी. अडचणी उद्भवल्‍यास थेट अधिकार्यांची कार्यालयात भेट घ्यावी. कार्यालयास आयएसओ मानांकन मिळाले असल्‍याने यातून आमच्‍या कामकाजाचा दर्जा विशद होतो. - भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agent demands money for work to RTO office nashik marathi news