esakal | शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार - कृषिमंत्री भुसे
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture Minister Bhuse promised to help the affected farmers Nashik News

बागलाण तालुक्यात गारपिटीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला कृषिमंत्र्यांनी दिले.

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार - कृषिमंत्री भुसे

sakal_logo
By
रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात गारपिटीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून, शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी नुकसानीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता.१९) दिली. 

बागलाण तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोसम व आरम खोऱ्यात गुरुवारी (ता. १८) तब्बल दोन तास झालेल्या वादळी वारा, गारपिटीमुळे गहू, हरभरा तसेच नुकताच लागवड केलेला उन्हाळ कांदा, कोथिंबीर, टोमॅटो या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे नमुने घेतले. आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे आदी उपस्थित होते. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

चार दिवसांत पिकांचे पंचनामे

 भुसे यांनी अंबासन, ताहाराबाद, अंतापूर, मुल्हेर, पिंगळवाडे, करंजाड येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. गारपिटीने सर्वाधिक पाच हजार हेक्टर उन्हाळ कांद्याची हानी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जिल्ह्यात बागलाण तालुक्यातच सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी यंत्रणेने नमूद केले आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चार दिवसांत पिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश भुसे यांनी दिले. या दौऱ्यात आबा बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, रेखा पवार, सुनील गवळी, मदन खैरनार, बंडू महाजन, सुरेश गवळी, विलास गवळी, सीताराम साळवे, अविनाश मानकर, सचिन वाणी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले

तुटपुंजी रक्कम नको - आमदार बोरसे 

बागलाण तालुक्यातील मोसम, करंजाडी खोऱ्यावर सात वर्षांनी पुन्हा गारपिटीचे संकट कोसळले. पोटच्या गोळ्यासारखे वाढवलेल्या पिकाचे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. या गारपिटीमुळे तालुक्यातील सुमारे दहा हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, डाळिंब पिकांचे नुकसान झाले असून, शासनाने तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांची बोळवण न करता भरीव मदत द्यावी, अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.