esakal | कृषिमंत्र्यांचा जिल्हा बँकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम; पीककर्ज जमा न झाल्यास बॅंकेत ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse.jpg

तालुक्यात १२२ कोटींपैकी फक्त २९ कोटी रुपये कर्ज वाटप झाले. नियमित कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये, सोमवार (ता. १४)पर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा बॅंकेत ठिय्याचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. १२) येथे दिला.

कृषिमंत्र्यांचा जिल्हा बँकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम; पीककर्ज जमा न झाल्यास बॅंकेत ठिय्या

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक : (मालेगाव) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकरी कर्जमुक्तीअंतर्गत जुलैतच ९१५ कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले. जिल्हा बॅंकेने फक्त ११५ कोटींचे खरीप कर्ज वाटप केले. ही संतापजनक व शेतकरी शक्तीला आव्हान देणारी बाब आहे. तालुक्यात १२२ कोटींपैकी फक्त २९ कोटी रुपये कर्ज वाटप झाले. नियमित कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये, सोमवार (ता. १४)पर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा बॅंकेत ठिय्याचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. १२) येथे दिला. 

शासकीय विश्रामगृहात पीककर्ज आढावा बैठकी

शासकीय विश्रामगृहावरील पीककर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी श्री. भुसे यांनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली. बैठकीस बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, जिल्हा बॅंकेचे कृषी अधिकारी एच. के. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, उपनिबंधक संगमेश्‍वर बदनाळे आदींसह राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी, शाखाधिकारी उपस्थित होते. 

अन्यथा जिल्हा बॅंकेत ठिय्या मांडू...

श्री. भुसे म्हणाले, की पीककर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयीकृत बँकांचे काम समाधानकारक असताना जिल्हा बँकेची भूमिका निषेधार्ह आहे. मालेगाव तालुक्यात ९० कोटींची मागणी असताना बँकेने ३० कोटीच निधी दिला. निधीअभावी शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर असूनही धनादेश मिळत नाहीत. खरीप हंगाम संपत आला. शेतकऱ्यांची चेष्टा करता का? ४५ कोटींचे प्रस्ताव पडून आहेत. टोलवाटोलवी करू नका, कर्जमुक्तीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे. जिल्हा बँकेने शेतकरीहिताच्या हेतूला हरताळ फासू नये. श्री. भुसे यांनी या वेळी नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दूरध्वनी करून सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग न झाल्यास जिल्हा बॅंकेत ठिय्या मांडू, असे सांगितले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

निर्धारित उद्दिष्टापेक्षा २५ ते ४० टक्के कर्जवाटप 

जिल्हा बँकेचे श्री. पिंगळे यांनी आढावा घेतो, असे सांगून वेळ मारून नेली. तर इतर बँकांच्या अधिकाऱ्यांनी खरीप कर्ज वाटपाची माहिती दिली. निर्धारित उद्दिष्टापेक्षा २५ ते ४० टक्के कर्जवाटप झाल्याचे निदर्शनास आले. कर्जवाटप लक्ष्यांक पूर्ण न झाल्याबद्दल भुसे यांनी नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांप्रति थोडी सहानूभुती दाखवा, सन्मानजनक वागणूक द्या. काही बॅंकानी पीक विमा, पीएम किसान योजना, घरकुल व वृद्धापकाळ योजना असे अनुदान परस्पर वर्ग केल्याच्या तक्रारी आहेत. त्यांचे निराकरण करा. आगामी काळात महिला बचतगट, गटशेती, कृषी प्रोड्युसर कंपनी, सहकार शेती व कृषीपुरक उद्योगांना कर्जवाटप करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


 

go to top