वसाका साखर निर्यातप्रकरणी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता 

रविंद्र पगार
Friday, 18 December 2020

वसंतदादा पाटील साखर कारखान्यातील संचालक मंडळाने निर्यातीसाठी दिलेली साखर निर्यातदाराने देशांतर्गत बाजारात विकून कारखान्याचे नुकसान केल्याप्रकरणी निर्यातदार व तत्कालीन संचालक मंडळावर दाखल केलेल्या आरोपपत्रातून सर्व २२ संचालकांची सटाणा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 

कळवण (जि.नाशिक) : वसंतदादा पाटील साखर कारखान्यातील संचालक मंडळाने निर्यातीसाठी दिलेली साखर निर्यातदाराने देशांतर्गत बाजारात विकून कारखान्याचे नुकसान केल्याप्रकरणी निर्यातदार व तत्कालीन संचालक मंडळावर दाखल केलेल्या आरोपपत्रातून सर्व २२ संचालकांची सटाणा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 

सर्व २२ संचालकांची सटाणा न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

विठेवाडी येथील वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केंद्र सरकारच्या परवानगीने ५५ हजार क्विंटल साखर निर्यातीसाठी निर्यातदार व्यापाऱ्याला विकली. तथापि निर्यातदाराने देशांतर्गत बाजारात ती साखर विकून एक कोटीपेक्षा अधिक नफा कमवला. याबाबत तक्रार झाल्याने शासनाकडून व्यापारी आणि तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी साखर नियंत्रण आदेश १९६६ चे नियम ९चे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३/६, ८ व ९ अन्वये सटाणा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची अंतिम सुनावणी सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम आव्हाड यांच्या न्यायालयात झाली. न्यायाधीश आव्हाड यांनी या खटल्यात १६ डिसेंबरला सर्व २२ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

नेत्यांचे व जनतेचे या निकालाकडे लागले होते लक्ष
माजी आरोग्यमंत्री दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत असताना हे वादग्रस्त प्रकरण उद्‍भवले होते. या खटल्याचे काम २००८ पासून सटाणा न्यायालयात सुरू होते. दरम्यानच्या काळात डॉ. आहेर व इतर चार संचालकांचे निधन झाले. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या चारही तालुक्यांतील प्रमुख नेते पोपटराव वाघ, विश्वास देवरे, नारायण पाटील, मंजुळाबाई पगार, तुळशीराम बिरारी, सुधाकर पाटील, शशिकांत पवार, संतोष मोरे, धनसिंग वाघ, फुला जाधव, बाजीराव पवार आदी संचालकांसह साखर विभागाकडील अधिकारी व कर्मचारी आरोपी असल्याने जिल्ह्यातील साखर उद्योगातील नेत्यांचे व जनतेचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागले होते. न्यायालयात सर्व २२ आरोपींची बाजू कळवणचे ज्येष्ठ ॲड. देवेंद्र सोनवणे यांनी मांडली. त्यांना सटाण्याचे ॲड. अभिमन्यू पाटील आणि ॲड. प्रशांत भामरे यांनी सहाय्य केले.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All 22 accused acquitted in Vasaka sugar export case nashik marathi news