चार महिन्यांतच नामपूर-मालेगाव रस्त्यावरचे डांबर गायब; कोट्यवधी रुपये पाण्यात

प्रशांत बैरागी
Saturday, 3 October 2020

अंबासन फाटा, कोठरे फाटा, हनुमान मंदिर, नामपूर महाविद्यालय आदी ठिकाणी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. शहरातील सर्वांत वर्दळीचा रस्ता म्हणून मालेगाव रस्ता ओळखला जातो. रास्त्यावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती गरजेची आहे.

नाशिक : (नामपूर) शहर व परिसरात यंदा झालेल्या पावसाने जवळपास सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. औरंगाबाद-अहवा राज्यमार्ग असलेल्या नामपूर-मालेगाव रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने चार महिन्यांतच रस्त्यावरील डांबर गायब झाले आहे. त्यामुळे रस्त्यासाठी झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. 

रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप 

नामपूर ते कोठरे फाट्यापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अक्षरश: शेतशिवारांना जोडणाऱ्या रस्त्यांपेक्षा बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने निचरा होण्यासाठी फरशी पूल होणे गरजेचे आहे. रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य असल्याने त्यात पाण्याचे डबके साचले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकामी दखल रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी करत आंदोलनाचा इशारा दिला. अंबासन फाटा, कोठरे फाटा, हनुमान मंदिर, नामपूर महाविद्यालय आदी ठिकाणी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. शहरातील सर्वांत वर्दळीचा रस्ता म्हणून मालेगाव रस्ता ओळखला जातो. रास्त्यावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती गरजेची आहे. 

डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण

यंदाच्या पावसाने रस्त्यांच्या साइडपट्ट्या तसेच अनेक खड्ड्यांत टाकलेली माती आणि रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी खड्डे उघडे पडले आहेत. काही रस्त्यांवरून जाताना माती साचलेली असून, अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असल्याने दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे. राजधन बंगल्याजवळील हनुमान मंदिराजवळ डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकामी तातडीने लक्ष घालून रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश विसपुते, शहराध्यक्ष रवी देसले, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण सावंत यांनी केली. 

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ॲड. रेखा शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष सचिन अहिरराव, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, सुरेश कंकरेज भाजपचे युवानेते रूपेश शहा, संदीप शिरसाठ, मोसम विकास प्रतिष्ठानचे गणेश खरोटे, सुनील निकुंभ, राजू पंचाळ, युवराज दाणी, कमलाकर सोनवणे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका उपाध्यक्ष किशोर खरे आदींनी केली. 

हेही वाचा > लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegation that Malegaon road work is inferior nashik marathi news