प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली; विक्रेत्यांनी गंगाघाटावर थाटली दुकाने

दत्ता जाधव
Thursday, 29 October 2020

गेल्या आठवड्यात ३०-४० विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटल्यावर वाद निर्माण झाला होता. त्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलिसांनी विक्रेत्यांना मज्जाव केल्यावर हे प्रकरण स्थानिक नगरसेवक शाहू खैरे यांच्याकडे गेले. 

नाशिक : (पंचवटी) महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागासह पोलिस यंत्रणेनेही विरोध केल्याने गेल्या आठवड्यात बुधवारचा आठवडेबाजार भरू शकला नव्हता. मात्र बाजाराबाबत ठोस निर्णय न झाल्याने आजही अनेक विक्रेत्यांनी गंगाघाटावर दुकाने थाटली. 

प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता थाटली दुकाने 

अनेक वर्षांपासून गंगाघाटाच्या दुतर्फा भरणारा आठवडेबाजार सहा महिन्यांत प्रशासनाच्या विरोधानंतर भरलेला नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने महापालिकेसह पोलिस प्रशासनाने बाजाराला आधीपासूनच विरोध केला. त्यामुळे विक्रेत्यांनी प्रयत्न करूनही प्रशासनाच्या ठाम विरोधामुळे सहा-सात महिन्यांपासून बाजार भरलेला नव्हता, गेल्या आठवड्यात ३०-४० विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटल्यावर वाद निर्माण झाला होता. त्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलिसांनी विक्रेत्यांना मज्जाव केल्यावर हे प्रकरण स्थानिक नगरसेवक शाहू खैरे यांच्याकडे गेले. 

पुन्हा काही विक्रेते त्याठिकाणी दाखल

श्री. खैरे यांच्या संपर्क कार्यालयात पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे व विक्रेते यांच्यात चर्चाही झाली होती. प्रशासनाचा विरोध व त्यानंतर सुरू झालेल्या धुवाधार पावसामुळे विक्रेत्यांनी माघार घेत दुकाने आवरून घेतल्याने तणाव निवळला होता. बुधवारी सकाळी पुन्हा काही विक्रेते या ठिकाणी दाखल होत त्यांनी दुकानेही थाटली. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

...मग फुलबाजाराला परवानगी कशी? 

प्रशासन भाजीविक्रेत्यांना व्यवसायाला मज्जाव करते. त्याच वेळी गणेशवाडीतील फुलबाजाराला मात्र परवानगी देते, याकडे भाजीविक्रेत्यांनी लक्ष वेधले. सकाळी भरणारा फुलबाजार आता आयुर्वेद सेवा संघाच्या प्रवेशद्वारापासून थेट गंगाघाटापर्यंत येऊन पोचला आहे. विशेष म्हणजे हा बाजार भररस्त्यात भरत असल्याने वाहनधारक व विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रसंगही उद्‍भवत आहेत.  

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Among the sellers regarding Wednesday's weekly market Confusion persists nashik marathi news