परसेवा विरुद्ध स्थानिक अधिकाऱ्यांत धुम्मस! महापालिकेत मोठ्या पदांवर काम करण्यास मिळत नसल्याची खंत 

विक्रांत मते
Wednesday, 7 October 2020

वास्तविक प्रशासन, अतिक्रमण या खात्यांवर कायमस्वरूपी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. परंतु या विभागातील एकही पदभार नाही. अतिरिक्त आयुक्त पदांपैकी एक स्थानिक, तर एक परसेवेतील अधिकाऱ्यांकडे पदभार देण्याची प्रथा आहे. परंतु दोन्ही पदांवर शासनाकडून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेच्या मुख्य पदांवर काही वर्षांत परसेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नगरसेवकांसह स्थानिक अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी नेतृत्व करण्यास तयार नसल्याने परसेवेतील विरुद्ध स्थानिक अधिकारी, अशी धुम्मस सरू झाली आहे. 

महापालिकेत मोठ्या पदांवर काम करण्यास मिळत नसल्याची खंत 
महापालिकेत अतिरिक्त आयुक्त दोन पदे व चार उपायुक्तांची पदे आहेत. या पदांवर महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांपैकी एकाकडेही पदभार नाही. प्रशासन उपायुक्तपदी मनोज घोडे-पाटील, विविध कर उपायुक्त प्रदीप चौधरी, अतिक्रमण उपायुक्त विजय पगार, समाजकल्याण उपायुक्त अर्चना तांबे, उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले, तर उपायुक्त म्हणून करुणा डहाळे यांची नियुक्ती करण्यात आली. वास्तविक प्रशासन, अतिक्रमण या खात्यांवर कायमस्वरूपी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. परंतु या विभागातील एकही पदभार नाही. अतिरिक्त आयुक्त पदांपैकी एक स्थानिक, तर एक परसेवेतील अधिकाऱ्यांकडे पदभार देण्याची प्रथा आहे. परंतु दोन्ही पदांवर शासनाकडून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नगरसेवकांकडून स्थानिक अधिकाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न होत नाही. यापूर्वी महापालिकेत काही अधिकारी स्थानिकांच्या बाजूने प्रशासनाशी लढायचे; परंतु ते सर्व अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे. त्यांचा पदोन्नतीचा हक्क हिरावल्यास शिवसेना सोडणार नाही. यासंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन म्हणणे मांडले जाईल. त्यानंतरही अडथळे आणल्यास प्रशासन उपायुक्तांना मूळ सेवेत पाठविले जाईल. -अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापलिका 

महापालिकेत पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. सध्या खातेप्रमुखांकडून पदोन्नतीपात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल भरून घेतले जात आहेत. आयुक्तांच्या मान्यतेनंतर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. -मनोज घोडे-पाटील, प्रशासन उपायुक्त, महापालिका  
 

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anger of not getting to work in big posts in corporation nashik marathi news