सकाळ इम्पॅक्ट : अखेर निफाडला अँटीजेन चाचणी सुरु; जिल्हा परिषद अध्यक्षांकडून दखल

माणिक देसाई
Friday, 25 September 2020

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी निफाडला १७ सप्टेंबर पासून कोरोना अँन्टीजेन तपासणी सुरु होणार असल्याचे सांगितले होते.

नाशिक/ निफाड : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तालुक्यात कोरोना अँटीजेन चाचणी सुरू करण्यात आल्या आहेत. तालुक्यात १७ सप्टेंबर पासून चाचणीस सुरूवात होणार होती.मात्र सात दिवस उलटूनही चाचणी सुरू न झाल्याने याबाबत ‘सकाळ’ वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी घेतल्यानंतर आज (ता.२५) तालुक्यात या चाचणी सुरू झाल्या आहेत. 

जागेअभावी चाचणी बंद

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी निफाडला १७ सप्टेंबर पासून कोरोना अँन्टीजेन तपासणी सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र २३ सप्टेंबर पर्यंत ह्या चाचण्या सुरू झालेल्या नव्हत्या. याबाबत माहिती घेतली असता केवळ जागेअभावी चाचणी सुरू होत नसल्याची बाब समोर आली होती. यानंतर ‘सकाळ’ ने याची देखील वृत्त प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तात्काळ वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाला चाचणी सुरू करण्यासाठी जागेची व्यवस्था करत तत्काळ चाचणी सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर या चाचण्या सुरू झाल्या आहेत. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

शहरात जिल्हा परिषद शाळा अहिल्यादेवी नगर येथे कोरोना अँटीजेन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरचे केंद्र रोज सकाळी १० वाजेपासून दुपारी साडेबारापर्यंत सुरू राहणार आहे. आज आठ रुग्णांची तपासणी केंद्रात करण्यात आली आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतन काळे, नोडल अधिकारी डॉ. योगेश शिंदे , वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल ताथेड, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. चाचणीसाठी येतांना नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपजिल्हा रुग्णालय यांचे संदर्भ सेवा पत्र आणि आधार कार्ड सोबत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

निफाडला सदर तपासणी गरजेची असल्याने त्याबाबत आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध केले होते. फक्त तपासणी केंद्रासाठी सुरक्षित जागा मिळत नव्हती अखेरीस समन्वयातून अहिल्यादेवीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत सदरचे अँटीजेन तपासणी केंद्र सुरु केले आहे. 
- बाळासाहेब क्षीरसागर, जि.प. अध्यक्ष 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: antigen testing facility started in niphad nashik marathi news