."बासी, तिवासी ईद'लाही असेच हवे सहकार्य!.. ग्रामीण पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. तर, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात लॉकडाऊन काळात सुमारे दोन हजार पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलिस दल आणि गेल्या आठवड्यात रॅपिड ऍक्‍शन फोर्सचे जवानही बंदोबस्तासाठी दाखल झालेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्गाला आळा बसावा यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करतानाच, मालेगावकरांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना राबविल्या गेल्या. 

नाशिक : कोरोना विषाणूच्या सावटाखाली मालेगाव आणि जिल्ह्यात "रमजान ईद' मुस्लिम बांधवांनी घरात थांबूनच साजरी करण्यात आली. याप्रमाणे, मंगळवारी (ता. 26) बासी आणि बुधवारी (ता. 27) तिवासी ईदनिमित्तानेही घरातच नमाज पठण करून साजरी करावी असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.

जनजागृती निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. तर, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात लॉकडाऊन काळात सुमारे दोन हजार पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलिस दल आणि गेल्या आठवड्यात रॅपिड ऍक्‍शन फोर्सचे जवानही बंदोबस्तासाठी दाखल झालेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्गाला आळा बसावा यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करतानाच, मालेगावकरांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना राबविल्या गेल्या. 

आवाहनाला सुमारे 6 लाख मुस्लिम बांधवांचा सकारात्मक प्रतिसाद

मालेगाव शहरात 600 मस्जिदी असून या ठिकाणी गेल्या दोन महिन्या जुम्मा नमाजसह नित्याची नमाज पठणही करण्यात आलेले नाही. तर, गेल्या 9 एप्रिल रोजी शब्बे बारात (बडी रात) या उत्सवाची नमाज पठणही मुस्मिल बांधवांनी घरात राहूनच केली. याच नमाजसाठी गेल्या 2019 मध्ये 10 लाख भाविक जमा झाले होते. तर, गेल्या वर्षी रमजान ईदच्या नमाजसाठी इदगाह मैदानावर तब्बल दीड लाख भाविक आले असता, त्यांचे स्वागत पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले होते. यंदा मात्र कोरोनामुळे मुस्लिम बांधवांना घरांमध्येच नमाज पठण करण्याचे आवाहन केले असता, त्यास सुमारे 6 लाख मुस्लिम बांधवांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यासाठी पोलिसांनी गेल्या दोन आठवड्यापासून शहरातील मुस्लिम धर्मगुरु, मौलानांची भेट घेत आवाहन केले. तसेच शहरातील गल्लोगल्ली पोलिस वाहनाच्या लाऊडस्पीकरवरून रमजान ईद, बासी आणि तिवासी ईदलाही घराबाहेर न पडता घरांमध्येच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई

बासी, तिवासी ईद 
रमजान महिन्यातील उपवासाची सांगता रमजान ईदच्या दिवशी होते. यावेळी मुस्लिम बांधव सामुहिक नमाज पठण केल्यानंतर पाहुणे मंडळीसमवेत उपवास सोडतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बासी आणि तिसऱ्या दिवशी तिवासीला मुस्लिम बांधव नजिकचे दर्गा वा प्रार्थनास्थळावर जाऊन प्रार्थना करतात आणि रमजान ईदचा आनंद साजरा करतात. कोरोनामुळे रमजान ईदची नमाज घरातच पठण केली, त्याचप्रमाणे बासी व तिवासी ईदलाही मुस्लिम बांधवांनी प्रार्थनास्थळी न जाता घरातच नमाज पठण करण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल संदेश

गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तामुळे मालेगावात तळ ठोकून असून, यादरम्यान विविध धार्मिक सण-उत्सवातही मालेगावातील मुस्लिम बांधवांनी संयम दाखवून पोलिसांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही विशेष आभार पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलेल्या संदेशाद्वारे मानले आहेत. 

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

असाच प्रतिसाद व सहकार्य हवा

गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस दिवसरात्र मेहनत घेत कोरोनाच्या सावटाखाली मालेगावात बंदोबस्त करीत आहेत. मुस्लिम बांधवांचे पवित्र सण याकाळात आले परंतु पोलिसांनी केलेल्या आवाहनास भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद व सहकार्य पोलिस प्रशासनाला मुस्लिम बांधवांनी करावे. - डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal of Rural Superintendent of Police to Malegaon residents due to Ramadan nashik marathi news