'त्या' बॅगेचा प्रवास त्र्यंबकेश्‍वर व्हाया नाशिकरोड..आश्‍चर्याचा धक्काच.! 

nashik road bag.jpg
nashik road bag.jpg

नाशिकरोड : नाशिक ते वापी बसने प्रवास करताना जेव्हा त्र्यंबकेश्‍वरजवळ 73 हजार रुपये असलेली बॅग हरवते अन्‌ वापीला पोचल्यावर नाशिक रोड रेल्वेस्थानकातून दूरध्वनी येऊन "तुमची बॅग येथे सापडली आहे. त्यातील रक्कम व साहित्य सहीसलामत असल्याची माहिती मिळते,' तेव्हा हे सगळे स्वप्नवत असल्यासारखे वाटते. परंतु होय हे खरे आहे. राहुल बिहारी गुप्ता या बॅगमालकाला हा सुखद धक्का रविवारी (ता. 8) बसला व त्याने कार्यतत्परता दाखविणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. 

या वेळी राहुलला आश्‍चर्याचा सुखद धक्काच...
नाशिकहून वापी गाडीत राहुल बिहारी गुप्ता नामक व्यक्ती प्रवास करीत होती. या वेळी त्र्यंबकेश्‍वरला काही प्रवासी उतरले. त्यांनी चुकून राहुलची बॅग स्वतःची समजून उचलून घेतली. त्यानंतर राहुल बिहारी गुप्ता वापीला पोचल्यानंतर त्यांना लक्षात आले, की आपली बॅग बसमध्ये नाही. मग त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. वापीहून ते कामानिमित्त पालघरलाही पोचले. वापी पोलिस या घटनेची चौकशी करीत होते. त्यातच राहुल यांना नाशिक रोड रेल्वेस्थानकामधून फोन आला. तुमची बॅग नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सापडली असून, ती घ्यायला या. या वेळी राहुलला आश्‍चर्याचा सुखद धक्काच बसला.

रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेने प्रवाशाला मिळाली 73 हजारांची रक्कम 

उपस्थानक प्रबंधक रणवत प्रसाद यांना वेटिंग रूममध्ये बॅग आढळली. त्यांनी आरपीएफचे उपनिरीक्षक जे. पी. राजपूत व जीआरपीएफचे जावेद शेख यांना बॅग सापडल्याची माहिती दिली. ही बॅग खोलून पाहिली असता यात सॅमसंग कंपनीचा मोबाईल, चार्जर, पाच साड्या आणि साड्यांमध्ये 73 हजार चारशे रुपये असे सापडले. या बॅगमध्ये सापडलेल्या सॅमसंगच्या मोबाईलच्या आधारे त्यांनी पालघर येथे राहुलला फोनवरून संपर्क साधून बॅगेसंबंधी माहिती दिली. राहुलने पालघर येथून नाशिक रोड रेल्वेस्थानक गाठले व आपली बॅग ताब्यात घेतली.

या वेळी अशोककुमार यादव, प्रमोद कुमार, जावेद शेख यांच्यासह रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. राहुल गुप्ता यांनी नाशिक रोड रेल्वेचे स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, रणवत प्रसाद, आरपीएफ व रेल्वे पोलिस यांचे आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com