अर्ली द्राक्ष पिकाला लवकरच विमाकवच; राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांची माहिती

अंबादास देवरे
Sunday, 1 November 2020

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरी पणाचा फटका या पिकाला बसत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे शासनाने या पिकाला विमा कवच देऊन शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. देशात अर्ली द्राक्ष पीक घेणारा कसमादे परिसर आहे.

सटाणा (नाशिक) : देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या अर्ली द्राक्ष पिकाला लवकरच विमा कवच देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली. 

देशात अर्ली द्राक्ष पीक घेणारा कसमादे परिसर

खालचे टेंभे (ता. बागलाण) येथील सह्याद्री शेती गटाच्या कार्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते. मेळाव्यात द्राक्ष उत्पादकांची बाजू मांडताना आमदार बोरसे म्हणाले, पावसाळ्यात अनेक धोके पत्करून नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, कळवण, देवळा भागातील शेतकरी अर्ली द्राक्ष पिकाचे उत्पादन घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरी पणाचा फटका या पिकाला बसत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे शासनाने या पिकाला विमा कवच देऊन शासनाने दिलासा देण्याची गरज आहे. देशात अर्ली द्राक्ष पीक घेणारा कसमादे परिसर आहे. शासनाने जुलै महिन्यापासून विमा लागू करावा असेही श्री बोरसे यांनी स्पष्ट केले. 

अस्तरीकरणसाठी अनुदान योजना सुरु करण्याचे सूतोवाच

आयुक्त धीरजकुमार यांनी प्लास्टिक अस्तरीकरणचा पर्याय सांगितला. यासाठी शेतकऱ्यांची वेगवेगळी मते व अनुभव आहेत. म्हणून एक अभ्यास गट तयार केला जाईल. त्यानुसार अस्तरीकरणसाठी अनुदान योजना सुरु करण्याचे सूतोवाचही आयुक्त धीरजकुमार यांनी केले. मेळाव्यास कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषी अधीक्षक एस.आर. वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी डी. जे देवरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, द्राक्ष उत्पादक तुषार कापडणीस, अरुण वाघ, भाऊसाहेब अहिरे, देवेंद्र धोंडगे, प्रकाश तानाजी, जिभाऊ कापडणीस, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, अशोक पवार आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

पुढचा काळ उत्पादक गटांचा 

कृषी आयुक्त धीरजकुमार म्हणाले की, राज्यात आतापर्यंत तीन हजार शेती उत्पादक गटांची नोंदणी झाली आहे. गट स्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी केंद्र सरकार कडून ३५टक्के अनुदानावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कोल्ड स्टोरेज, निर्यात केंद्र, खरेदी विक्री केंद्र सुध्दा उभारता येणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा शेती उत्पादक गटांसाठी नक्कीच चांगलाच राहणार असून शेतकऱ्यांनी त्यासाठी उत्पादक गटांची जास्तीत जास्त उभारणी करावी. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arli grape crop is insured soon nashik marathi news