बनावट शासकीय संकेतस्थळावर 'त्याने" चक्क 199 जागांसाठी मेगा नोकरभरती जाहीर केली होती....अखेर..

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

तो बीई-सिव्हिल असून, त्याला संगणकाची चांगली माहिती आहे. त्यानेच आदिवासी विकास आयुक्तालयाचे mahatribal.webs. com या नावाचे बनावट संकेतस्थळ तयार करून तीन हजार 199 जागांसाठीची मेगा नोकरभरती जाहीर केली होती. यात सिव्हिल इंजिनिअर, इलेक्‍ट्रिक इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात केले होते.

नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने बनावट संकेतस्थळावर मेगा नोकरभरतीची जाहिरात करीत फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत मुख्य संशयिताला जळगाव येथून अटक केली. न्यायालयाने त्यास येत्या सोमवार (ता. 2)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, चौकशीतून मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्‍यता आहे. उच्चशिक्षित असलेल्या या संशयिताने "आदिवासी'चे बनावट संकेतस्थळ तयार करून तीन हजार 199 विविध पदांची मेगा नोकरभरती जाहीर केली होती. 

सायबर पोलिसांनी घेतले जळगावातून ताब्यात
या प्रकरणी आदिवासी विकासचे सहाय्यक आयुक्त अविनाश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या 18 फेब्रुवारीस नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जितेंद्र रामा तायडे (वय 24, रा. पुरी, पो. बलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. तो बीई-सिव्हिल असून, त्याला संगणकाची चांगली माहिती आहे. त्यानेच आदिवासी विकास आयुक्तालयाचे mahatribal.webs. com या नावाचे बनावट संकेतस्थळ तयार करून तीन हजार 199 जागांसाठीची मेगा नोकरभरती जाहीर केली होती. यात सिव्हिल इंजिनिअर, इलेक्‍ट्रिक इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात केले होते. अर्जासाठी खुल्या प्रवर्गाला 500 रुपये आणि इतरांसाठी 350 रुपये शुल्क आकारणी करीत हे शुल्क ऑनलाइन मागविले होते. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांत भरती असून मुंबईसाठी एक हजार 31, नाशिक 724, पुणे 866, जळगाव 578 जागा भरणार असल्याची mahatribal.webs.com या बनावट संकेतस्थळावर माहिती दिली होती. 

जळगावातून केली अटक 
संशयित तायडे याने बनावट संकेतस्थळावरून ऑनलाइन पेमेंटसाठी payumoney या वॉलेटशी लिंक केले होते. नाशिक सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांच्यासह पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला व जळगावमध्ये सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, मोबाईल, दोन मोबाईल सीमकार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्याला 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयिताच्या चौकशीतून मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा.

संशयित उच्चशिक्षित असून, संगणक प्रोग्रॉमिंगचेही त्याला ज्ञान आहे. चौकशीतून त्याच्या साथीदार आणि यापूर्वीही त्याने अशा पद्धतीने गुन्हा केल्याची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. या बनावट जाहिरातीनुसार अर्ज करीत पैसे भरले असतील, अशा उमेदवारांनी सायबर पोलिसांकडे संपर्क साधावा. -देवराज बोरसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested website maker who made fake tribal division Nashik Marathi crime news