esakal | डॉक्‍टरांवर हल्ला केल्यास  गुन्हे दाखल होणार - भुजबळ 
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal234.jpg

खासगी रुग्णालयांच्या अवाजवी बिलासंदर्भात प्राप्त तक्रारींची शहानिशा करून कार्यवाही केली जाईल. सरकारने पुनश्‍च हरि ओमचा नारा दिला असताना पुन्हा शहरात लॉकडाउन करणे शक्‍य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

डॉक्‍टरांवर हल्ला केल्यास  गुन्हे दाखल होणार - भुजबळ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना काळात जीव धोक्‍यात घालून डॉक्‍टर, नर्सेस सेवा देत असताना त्यांच्यावर हल्ला होत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. 4) दिला. 

तक्रारींची शहानिशा करून कार्यवाही
ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या तयारीची पाहणी श्री. भुजबळ यांनी केली, त्या वेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, की ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये 350 खाटा असून, त्यातील 50 खाटा ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. कोविड सेंटरमध्ये ड्रेनेजची समस्या होती; परंतु महापालिकेतर्फे सूचना देण्यात आल्या. ठक्कर डोम येथील कोविड सेंटरला काही नागरिकांचा विरोध असला तरी सेंटर बंदिस्त असल्याने नागरिकांना त्रास होणार नाही. कोविड सेंटरमध्ये स्त्री, पुरुष रुग्ण, पोलिस, डॉक्‍टरांची स्वतंत्र व्यवस्था आहे. या भागात विशेष पोलिस बंदोबस्त राहील. खासगी रुग्णालयांच्या अवाजवी बिलासंदर्भात प्राप्त तक्रारींची शहानिशा करून कार्यवाही केली जाईल. सरकारने पुनश्‍च हरि ओमचा नारा दिला असताना पुन्हा शहरात लॉकडाउन करणे शक्‍य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या वेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माजी आमदार जयवंत जाधव, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, अनिल आहेर आदी उपस्थित होते. 

भाजप लोकप्रतिनिधींना टोमणा 
वीजदरवाढीविरोधात शुक्रवारी भाजपतर्फे शहरात आंदोलन करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा आंदोलनकर्त्या आमदारांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री भुजबळ यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव वाढत असल्याने भाजपवाल्यांना पंतप्रधान मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगायचे होते, परंतु थेट त्यांना विरोध नको म्हणून वीजदरवाढीविरोधात आंदोलन केले असावे, असा टोमणा मारला. 

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

सरकार पाच वर्षे टिकेल 
महाविकास आघाडीमधील धुसफुशीच्या चर्चेवर बोलताना श्री. भुजबळ यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय असल्याचे स्पष्ट केले. विरोधकांकडून वावड्या उठविल्या जात असून, सरकारमध्ये धुसफूस नसल्याचे सांगताना काळजी करू नका, ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असा टोला विरोधकांना लगावला. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​