लासलगावला ‘प्राप्तिकर’च्या छाप्यांनंतर लिलाव बंद! शेतकरी कांद्यासह माघारी; लिलाव न सुरू झाल्यास रास्ता रोको

onion traders
onion traders

नाशिक/लासलगाव : उन्हाळ कांद्याने पाच हजारांचा टप्पा गाठला असतानाच व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याने गुरुवारी (ता.१५) व्यापारी वर्ग लिलावात सहभागी झाला नाही. परिणामी कांद्याचे लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांवर आपले उत्पादन घरी परत नेण्याची वेळ आली. दरम्यान, कांद्याचे लिलाव त्वरित सुरू न झाल्यास नाशिक जिल्हा शेतकरी संघर्ष संघटनेतर्फे रास्ता रोको इशारा देण्यात आला आहे. 

कांद्याचे भाव कोसळण्याची भीती

यंदाचा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त झालेला असताना परतीच्या मान्सूनचा मुक्काम थोडाफार वाढल्याने दमट हवामानामुळे चाळीत ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे. अतिवृष्टीमुळे आगामी लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी वाढल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दराने तीन हजाराचा टप्पा ओलांडताच केंद्राने १४ सप्टेंबरला कांद्याची निर्यात बंदी लादली. केंद्राने बरोबर एक महिन्याने म्हणजे १४ ऑक्टोबरला कांदा पाच हजाराचा टप्पा गाठण्याच्या तयारीत असतानाच लासलगाव, पिंपळगाव येथील दहा प्रमुख कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापे मारले. दोन दिवस कसून तपासणी चालू असताना दुसऱ्या दिवशी गुरुवारी कांदा व्यापारी लिलावात सहभागी न झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांद्याचे लिलाव झाले नाहीत. यामुळे कांद्याचे भाव कोसळणार तर नाही ना? अशी भीती आता कांदा उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान लासलगाव बाजार समितीत ‘सकाळ’च्या सत्रातील कांद्याचा लिलावासाठी आलेले वाहने विंचूर बाजार समितीमध्ये लिलावासाठी पाठवण्यात आले. 


कांदा व्यापाऱ्यांवर बुधवारी पडलेल्या छाप्यामुळे गुरुवारी बाजार समितीत आणलेला कांदा लिलाव न झाल्यामुळे परत घरी घेऊन जाण्याची नामुष्की आली. यामुळे वाहतुकीचा खर्च सुद्धा आमच्याच माथी पडला. कांद्याचे लिलाव त्वरित सुरू करावे. 
- योगेश रायते, शेतकरी, खडकमाळेगाव 

प्राप्तिकराच्या छाप्यांमुळे लिलाव ठप्प झाले आहेत. यासाठी बाजार समितीचे प्रशासन व कांदा व्यापारी यांच्यामध्ये बैठक घेऊन सन्मानजनक तोडगा काढला जाईल. केंद्राच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांच्या कांद्याच्या भावाला फटका बसतो. याबाबत बाजार समितीच्या वतीने आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत. 
- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती 

कांद्याच्या भावात चढ- उतार झाले की केंद्राकडून तातडीने दखल घेतली जाते. आता दरवाढ रोखण्यासाठी केंद्राने व्यापारी वर्गावर मारलेले छापे या कारवाईतून काय निष्पन्न होणार आहे. 
- जयदत्त होळकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती 

कांद्याच्या दरात समाधानकारक वाढ होत असतानाच केंद्राकडून दरवाढ रोखण्यासाठी केंद्राकडून प्राप्तिकर विभागाचे छापे टाकण्याचे हत्यार उपसले गेले. या सततच्या कारवाईमुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे. कांद्याचे लिलाव त्वरित सुरू न झाल्यास संघटनेच्यावतीने जिल्ह्यात रास्तारोको केला जाईल. 
- हंसराज वडघुले, संस्थापक, शेतकरी संघर्ष संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com