नाशिकमधील मनमानी करणाऱ्या शाळांचे लेखापरीक्षण करा; बच्चू कडू यांचे आदेश

प्रमोद दंडगव्हाळ
Thursday, 24 September 2020

या शैक्षणिक संस्थेच्या संचालक व व्यवस्थापकांकडून कोरोना काळात शासनाने निर्देशित केलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जात नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. उपरोक्त शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी, महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नव्हती.

नाशिक/सिडको : नाशिकमधील काही इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मनमानी कारभाराविरोधातील तक्रारींवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला संबंधित शाळांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. 

शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारी

नाशिक केंब्रिज स्कूल, सेंट लॉरेन्स स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, रायन इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक संस्थेच्या संचालक व व्यवस्थापकांकडून कोरोना काळात शासनाने निर्देशित केलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जात नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. उपरोक्त शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी, महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नव्हती. अशा शैक्षणिक संस्थांविरोधात पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न करूनसुद्धा पोलिस तक्रारी घेत नव्हते. तसेच पोलिस शाळेशी संगनमत करून उलट पालकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत ही बाब तक्रारकर्त्या पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनास आणून दिली. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

दोषारोप निश्चित करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत

या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई सुरू करावी. मनमानी कारभार करणाऱ्या संस्थाचालकांवर दोषारोप निश्चित करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सोबतच कर्तव्यात कसूर करणाऱ्या लोकसेवकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, असे निवेदन मुंबईत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना सिडको व इंदिरानगर शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे, सुयश पाटील, प्रदीप यादव, योगेश पालवे, हरीश वाघ, संतोष कदम आदींनी दिले होते. त्या तक्रारींच्या अनुषंगाने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित शाळांचे लेखापरीक्षण तसेच ज्या शाळांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Audit schools in Nashik orders bachchu kadu nashik marathi news