''संयम ठेवा अन्‌ इतरांचा जीव धोक्‍यात घालू नका'' - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर दिल्याने रुग्णांचे प्राथमिक निदान झाले. त्यामुळे कोरोना केअर सेंटरमध्ये 70 टक्के रुग्ण बरे झालेत. कोरोना मुक्‍तांवर लक्ष ठेवण्यात आले. त्यांच्यामुळे इतरांना लागण झाली नसल्याची खातरजमा केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

नाशिक : कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर दिल्याने रुग्णांचे प्राथमिक निदान झाले. त्यामुळे कोरोना केअर सेंटरमध्ये 70 टक्के रुग्ण बरे झालेत. कोरोना मुक्‍तांवर लक्ष ठेवण्यात आले. त्यांच्यामुळे इतरांना लागण झाली नसल्याची खातरजमा केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. लॉकडाउन शिथिल केल्याने जबाबदारी संपली असे नाही, संयम ठेवून इतरांचा जीव धोक्‍यात जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले. 

तर संयम ठेवायला हवा

श्री. मांढरे म्हणाले, की ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. व्यवसाय- नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा फैलाव रोखला जाईल. आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा अथवा इतर कुणाचा जीव धोक्‍यात घालायचा नसेल, तर संयम ठेवायला हवा. गर्दी होत असलेल्या आस्थापना बंद करत त्यांच्या सवलती काढून घेण्याची कठोर वेळ यायला नको. नाशिक व मालेगाव महापालिका "रेड झोन'मध्ये असल्याने हे क्षेत्र वगळता अन्य जिल्हाभरात सर्वत्र दैनंदिनी सुरू झाली आहे. साडेचारशे छोट्या-मोठ्या कंपन्या सुरू होऊन साठ हजारांहून अधिक कामगार कामावर येत आहेत. रोजगार हमीच्या कामांवर पन्नास हजार मजूर येत असून, शेतीची कामेही सुरू आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

व्यवस्थापनामुळे सुरवातीला रुग्ण नव्हते 

भोवतालच्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळू लागल्यानंतर मार्चच्या सुरवातीपासून उपाययोजनांना सुरवात केली. आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत सावधगिरी बाळगली. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यांमध्ये मार्चच्या मध्याला दोन ते तीन आकड्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पोचली असताना नाशिकमध्ये रुग्ण नव्हते. 28 मार्चला पहिला रुग्ण आढळल्यानंतर कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर दिला, असे सांगून श्री. मांढरे म्हणाले, की मालेगावमध्ये लॉकडाउननंतरही बाहेरून काही प्रमाणात लोक आल्याने 8 एप्रिलला कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यांच्यासह संपर्कातील व्यक्‍तींना तातडीने क्‍वारंटाइन केले. मालेगावच्या भौगोलिक परिस्थितीसह अन्य आव्हाने होती. तेथे बाधितांची संख्या वाढत असताना, स्थानिक मौलानांची मदत घेत जनजागृती केली आणि सर्वांपर्यंत पोचलो. 

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

दुपटीचा दर 49 दिवसांवर 

सद्यःस्थितीत मालेगावच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची "डेटा एंट्री' प्रक्रिया पूर्ण केली आहे. "कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग'साठी 691 जणांच्या नोंदी घेतल्या आहेत. मृत आणि बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांचा "डेटा अपडेट' केला आहे. दुप्पट रुग्णसंख्येच्या दरात बदल झाला आहे. 15 एप्रिलला हा दर 2.2 दिवसांचा होता. तो आता 49 दिवसांवर पोचला आहे. शिवाय कोरोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे पोचला असला, तरी त्यापैकी सातशेहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये बिकासूल, सी विटॅमिन, क्रोसिन आदी बाबी प्रोटोकॉलप्रमाणे दिल्याने व रुग्णांच्या इच्छाशक्‍तीमुळे चांगला प्रतिसाद मिळाला. मृतांपैकी बहुतांश रुग्ण उपचारार्थ उशिरा दाखल झाले होते, असेही श्री. मांढरे यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be patient and do not endanger the lives of others - Collector Suraj Mandhare nashik marathi news