हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

घोटी येथील आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तरी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतरांचे आणि नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तीन दिवसांपासून कामकाज ठप्प असलेल्या आणि बाजारपेठेचे प्रमुख गाव असलेल्या घोटीतील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

नाशिक : (घोटी) येथील आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तरी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतरांचे आणि नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तीन दिवसांपासून कामकाज ठप्प असलेल्या आणि बाजारपेठेचे प्रमुख गाव असलेल्या घोटीतील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

सर्व व्यवहार बंद करत स्वयंस्फूर्तीने कडेकोट बंद

शनिवारी (ता.23) प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच घोटीसह लगतच्या लहान लहान खेड्यांतील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती. आठवडाभर शहरातील सर्व व्यवहार बंद करत स्वयंस्फूर्तीने कडेकोट बंद पुकारला. तालुका आरोग्याधिकारी डॉ. बी. जी. देशमुख यांच्या माहितीनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्य व एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्‍टर यांचे कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची आनंदाची आहे. ग्रामीण अदिवासी भागातील घोटी शहर हे महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. बाजारपेठ असल्याने चार जिल्ह्यांतील नागरिक विविध कारणांसाठी येथे येत असल्याने शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. संपूर्ण शहर, शहरातील गल्ली व वस्त्यांचे रस्ते नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केले होते. मात्र नागरिकांनी काळजी घेत घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

इगतपुरी तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव झाला असला, तरी त्याचवेळी संपर्कातील काहींचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समाधान आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. - डॉ. बी. जी. देशमुख (तालुका वैद्यकीय अधिकारी)

हेही वाचा > ''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona reports of suspects in contact with a health worker were negative nashik marathi news