लॉकडाउनचा येवला बस आगाराला फटका; तब्बल 'इतक्या' कोटींचा तोटा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

"एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या एसटीच्या चाकांना कोरोनामुळे ब्रेक लागला असून एकाच जागेवर उभी राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आज बरोबर दोन महिने झाले, येवल्यात आगारात लालपरी जागेवरच उभी आहे तर 250 वर कर्मचारी घरी बसून आहेत, तर वाहतूक ठप्प झाल्यामुळे रोज सुमारे पाच लाखांप्रमाणे लालपरीने तब्बल तीन कोटींच्या उत्पन्नाचा तोटाही सहन केला आहे. 

नाशिक / येवला : "एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या एसटीच्या चाकांना कोरोनामुळे ब्रेक लागला असून एकाच जागेवर उभी राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आज बरोबर दोन महिने झाले, येवल्यात आगारात लालपरी जागेवरच उभी आहे तर 250 वर कर्मचारी घरी बसून आहेत, तर वाहतूक ठप्प झाल्यामुळे रोज सुमारे पाच लाखांप्रमाणे लालपरीने तब्बल इतक्या कोटींच्या उत्पन्नाचा तोटाही सहन केला आहे. 

अजून किती दिवस चाके ठप्प

आपल्या अर्थचक्राला आधार देणारी ही लालपरी रस्त्यावर यावी अन्‌ वाहतूक सुरू व्हावी, यासाठी कर्मचारीही आतुर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील रेल्वे, बस सेवा बंद झाल्या आहेत. जिथे रेल्वे आणि लोकल बंद झाल्या, तिथे बसची काय अवस्था? परिणामी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आगारात 46 बस जागेवरच उभ्या राहिल्या आहेत. अर्थात, कोरोनामुळे सर्वांचे जीवनमान थांबल्याने एसटीलाही त्याचा मोठा फटका बसला आहे. सलग साठ दिवस बसेस उभ्या असलेल्याने आता त्यांच्या देखभाल आणि दुरूस्तीचा प्रश्‍न देखील निर्मिण होणार आहे.
 आज घडीला येवला तालुका "रेड झोन'मध्ये असल्याने एसटी लवकर सुरू होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. कोरोनाच्या या गोंधळात मात्र आगाराचे सुमारे तीन कोटींचे उत्पन्न बुडाले असून, अजून किती दिवस चाके ठप्प राहतील, याचा अंदाज नसल्याने कर्मचारीही धास्तावले आहेत.

चालक, वाहक व सपोर्ट स्टाफ घरी बसून कंटाळले

येवला आगारातून रोज पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, कळवण, मालेगाव, मनमाड, नगर अशा दूरवर प्रवाशांना घेवून जातात. आगाराकडून 46 बसच्या माध्यमातून रोज सरासरी साडेचार हजार प्रवाशांचा प्रवास होतो. आगारात 96 चालक असून, 81 वाहक, तर 23 चालक तथा वाहक आहेत. वर्कशॉपसह इतर कर्मचारी रोज न चुकता आगारात येऊन बसची काळजी घेत आहेत. मात्र पाच लाखांचे उत्पन्न देणाऱ्या बस आगारात एकमेकांना पाहत भविष्याचा विचार करत आहेत. चालक, वाहक व सपोर्ट स्टाफ आता घरी बसून कंटाळले आहेत. परराज्यातील मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी आगाराकडून झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश येथील नागरिकांना महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या सीमेवर सेंधवा येथे सोडण्यासाठी अवघ्या 13 बस सोडल्या होत्या, तर काही प्रवाशांना नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सोडले होते. केवळ ह्या कामासाठी केवळ आणि केवळ एकच दिवस या आगारातील लालपरी ही रस्त्यावर धावली. लॉकडाऊनमुळे येवला आगारास साठ दिवसात तीन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

 हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

रोजच काम करण्याची सवय झाल्याने आता एसटीशिवाय करमत नाही. आमचा उदरनिर्वाहाचा हा आधार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्व नव्या जोमाने प्रवाशांच्या सेवेत येऊ व प्रवासीही आमच्यावरील विश्‍वास कायम ठेवतील, अशी आशा आहे. - संदीप मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, येवला

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beacuse of Lockdown Yeola depot loss of Rs 3 crore to in 60 days nashik marathi news