आयडियाच्या ग्राहकांनो सावधान! "तो' फोन आल्यास होऊ शकते फसगत...अनेकांना केले टार्गेट!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

ऑनलाईन भामट्यांची टोळीचे कनेक्‍शन पंजाब राज्यातील लुधियानापर्यंत पोहोचले आहे. सायबर पोलिसांनी संशयितांचा माग काढला आहे. मात्र सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने परराज्यात जाणे काहीसे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांना थेट लुधियानात जाण्यास मर्यादा पडल्या आहेत.

नाशिक : ऑनलाइन भामट्यांचे कनेक्‍शन पंजाबमधील लुधियानापर्यंत पोचले आहे. लॉकडाउनमध्ये सायबर पोलिसांना तपास कामात अडचण येते आहे. दरम्यान, या भामट्यांनी आयडिया सेल्युलर कंपनीच्या ग्राहकांचा डाटा ब्लॅक मार्केटमधून खरेदी केल्याने आयडियाच्याच ग्राहकांनाच विशेषकरून आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. 

लुधियाना शहर ऑनलाइन भामट्यांचा नवीन अड्डा ​

गेल्या तीन आठवड्यांमध्ये नाशिक शहरात अनेकांना आयडिया सेल्युलर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून ऑनलाइन भामट्याचे फोन येत आहेत. संशयित, फोन करताना तुमचे सिमकार्ड थ्रीजी आहे. ते आम्ही ऑनलाइन फोरजी सिमकार्डमध्ये ऍक्‍टिव्हेट करून देतो, असे सांगितले जाते. त्यावेळी संशतियांकडून फोनचे माहिती घेतानाच फोन ज्या बॅंक खात्याशी जोडलेला आहे, त्याचीही माहिती फेरतपासणीचे कारण देत घेतली जाते. त्यावेळी समोरच्याचा विश्‍वास संपादन करून संशयित बॅंक खात्याची माहिती घेतल्यानंतर, तात्काळ त्यावरून ऑनलाईन खरेदी करतात. त्यावेळी आलेले पासवर्डही ते समोरच्याकडून विचारून घेतात आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये संशयित समोरील व्यक्तीच्या बॅंक खात्यावरून ऑनलाईन खरेदी वा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत. आत्तापर्यंत शहरातील आठ जणांना अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली असून, त्यांना सुमारे 20 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

संशयितांचे रॅकेट लुधियानात 
थ्री-जी टू फोर-जी सीमकार्ड ऍक्‍टिव्हेटचे आमिष दाखवून गंडा घालणारी ऑनलाईन भामट्यांची टोळीचे कनेक्‍शन पंजाब राज्यातील लुधियानापर्यंत पोहोचले आहे. सायबर पोलिसांनी संशयितांचा माग काढला आहे. मात्र सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने परराज्यात जाणे काहीसे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांना थेट लुधियानात जाण्यास मर्यादा पडल्या आहेत. मात्र, ऑनलाईन पैसे ट्रान्सफरला सायबर पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बहुतांश गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला उशिराने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, त्यांच्या रकमांना अटकाव करता आलेला नाही. 

हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका
विशिष्ठ कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्यांच संशयितांकडून फोन करून गंडा घातला जात आहे. यावरून त्यांना त्याच कंपनीचा डाटा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांनी फोर- जी सीमकार्ड ऍक्‍टिव्हेट करण्यासंदर्भात फोन करणाऱ्यांपासून सावधगिरी बाळगावी. कोणतीही गोपनीय माहिती देऊ नये. - देवराज बोरसे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, नाशिक

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?

डल्ला मारण्याचा नवीन फंडा

थ्रीजीचे फोरजी सिमकार्ड ऍक्‍टिव्हेट करून देण्याचे आमिष दाखवून, गोपनीय माहिती घ्यायची. त्यानंतर, त्या गोपनीय माहितीच्या आधारे बॅंकेतील रकमेवर डल्ला मारण्याचा नवीन फंडा ऑनलाइन भामट्यांनी काढला आहे. आतापर्यंत शहरातील आठ जणांना सुमारे 20 लाख रुपयांना गंडा घातला आहे.ऑनलाइन भामट्यांचे कनेक्‍शन पंजाबमधील लुधियानापर्यंत पोचले आहे. लॉकडाउनमध्ये सायबर पोलिसांना तपास कामात अडचण येते आहे. दरम्यान, या भामट्यांनी आयडिया सेल्युलर कंपनीच्या ग्राहकांचा डाटा ब्लॅक मार्केटमधून खरेदी केल्याने आयडियाच्याच ग्राहकांनाच विशेषकरून आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beware It can be fraudulent if the phone arrives nashik marathi news