ऐन सणासुदीच्या काळात कांदा दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांना मोठा फटका  

onion price 4.jpg
onion price 4.jpg

लासलगाव/पिंपळगाव बसवंत : केंद्र शासनाने कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केलेला खटाटोप व अलवार (राज्यस्थान), इंदोरसह महाराष्ट्रात कांद्याची दुप्पटीने आवक झाल्याने कांद्याच्या दरावर दबाव आला. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये मंगळवारी (ता. ३) कांदा दरात मोठी घसरण झाली. लासलगावला प्रतिक्विंटल एक हजार २०० रुपये, तर पिंपळगाव बसवंत येथे नऊशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 

पिंपळगाव बसवंत, लासलगावला शेतकऱ्यांना फटका 
गेल्या महिन्याभरापासून कांदादरातील तेजी रोखण्यासाठी केंद्र शासन शेतकरीविरोधी धोरण राबवित आहे. कांदा निर्यातबंदी, व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीवर मर्यादा व इराकच्या कांद्यासाठी पायघड्या यांसारख्या निर्णयांमुळे अखेर मंगळवारी कांद्याचे दर गडगडले. पिंपळगाव बसवंत बाजार आवारात मंगळवारी एक हजार ट्रॅक्टर, जीपमधून उन्हाळ व लाल कांद्याची तब्बल वीस हजार क्विंटल आवक झाली. राज्यस्थानच्या अलवार बाजार समितीत ५० किलो पॅकिंग असलेल्या २५ हजार गोण्या लिलावासाठी आल्या. तर इंदोरमध्ये पाच हजार टन कांदा विक्रीसाठी आला. परराज्यातून कांदा आयात होत असल्याने दर कोसळतील, या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला. 

पिंपळगावला दीड कोटींचे नुकसान 
पिंपळगाव बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांद्याला सरासरी सहा हजार रुपये, तर लाल कांद्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लिलाव सुरू होताच कांदा दरात तब्बल नऊशे रुपयांनी घसरण झाली. उन्हाळ कांद्याला सरासरी चार हजार आठशे, कमाल सहा हजार तीनशे रुपये दर मिळाला. लाल कांद्याला सरासरी चार हजार, तर कमाल पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारच्या तुलनेत शेतकऱ्यांना एकट्या पिंपळगाव बाजार समितीत दीड कोटी रुपयांची आर्थिक झळ बसली. अचानक बंपर आवक झाल्याने व निर्यातबंदी असल्याने दरात पडझड झाल्याचे कांदा व्यापारी अतुल शाह यांनी सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

लासलगावला सर्वाधिक घसरण 
लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी  कांद्याच्या किमान बाजारभावात क्विंटलमागे तब्बल एक हजार २०० रुपयांची, तर कमाल बाजारभावात ८९१ रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येथे मंगळवारी ४५० वाहनांतून पाच हजार शंभर क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला कमाल पाच हजार ३००, सर्वसाधारण चार हजार शंभर, तर किमान पंधराशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीचे सचिव  नरेंद्र वाढवणे यांनी ही माहिती दिली. 

आत्महत्या करण्याची वेळ

ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा, असा प्रश्‍न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मात्र, आत्महत्येनंतर कितीही मदत दिल्यास त्याचा काय फायदा? -माणिक आव्हाड, कांदा ऊत्पादक शेतकरी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com