esakal | बायोडिझेल बंदने इंधन विक्रीत वाढ; जिल्ह्यातील पेट्रोलपंप पूर्वपदावर  
sakal

बोलून बातमी शोधा

biodisel 1.jpg

बायोडिझेलच्या नावाने विविध इंधन भेसळ करून कमी दरात बायोडिझेल विक्रीचा नवा गोरखधंदा राज्यात फोफावला होता. केंद्राने बायोडिझेल विक्रीला चालना देण्याचे धोरण निश्‍चित केल्याने कुठलीही परवानगी न घेता सर्रास बायोडिझेल विक्री सुरू झाली होती.

बायोडिझेल बंदने इंधन विक्रीत वाढ; जिल्ह्यातील पेट्रोलपंप पूर्वपदावर  

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील विनापरवाना व अवैधरीत्या बायोडिझेल (बी १००) विक्री करणाऱ्या १४ ते १५ पंपांनी गाशा गुंडाळल्याने, तसेच चोरट्या मार्गाने विक्री होणाऱ्या भेसळयुक्त बायोडिझेलला चाप लागल्याने मालेगाव- मनमाड, धुळे- सुरत या मार्गांसह गुजरातनजीकच्या पेट्रोलपंपांच्या डिझेल विक्रीत २० टक्के वाढ झाली आहे. 

बायोडिझेल बंदने इंधन विक्रीत वाढ
बायोडिझेलच्या नावाने विविध इंधन भेसळ करून कमी दरात बायोडिझेल विक्रीचा नवा गोरखधंदा राज्यात फोफावला होता. केंद्राने बायोडिझेल विक्रीला चालना देण्याचे धोरण निश्‍चित केल्याने कुठलीही परवानगी न घेता सर्रास बायोडिझेल विक्री सुरू झाली होती. राज्य व केंद्रीय मंत्रालयाने त्याची दखल घेत कारवाई केल्यानंतर या प्रकारांना आळा बसला. राज्यात एका नामांकित कंपनीचा पंप सील करण्याची पहिली कारवाई मालेगाव येथे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केली.

जिल्ह्यातील पेट्रोलपंप पूर्वपदावर 

शहरातील जाफरनगर भागात व जायखेडा येथेही छापा टाकून अवैधरीत्या बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. निफाड येथील पंप सील झाला. मुळातच कोरोना लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील पेटोलपंप व्यावसायिकांचा व्यवसाय २५ टक्क्यांवर आला होता. हळूहळू अंदाज झाल्यानंतर व्यवसाय वाढत असताना डिझेलपेक्षा २० ते २५ रुपये स्वस्त बायोडिझेल मिळत असल्याने या इंधनाचा वापर वाढला होता. नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने या संदर्भात आवाज उठविताच कारवाईला सुरवात झाली. गुजरातच्या सीमेवरील पंपही रातोरात गायब झाले. मालेगाव-मनमाड महामार्गावरील पेट्रोलपंपांवर डिझेल विक्रीत २० हजार लिटरने वाढ झाली आहे. 

शासनाच्या महसुलालाही हातभार
राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर इंधन विक्रीतही वाढ होऊ लागली. सध्या ६० ते ६५ टक्के व्यवसाय होत असल्याचे फामफेडाचे सचिव सुदर्शन पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, तसेच हॉटेल उद्योग, बांधकाम व अवजड यंत्रसामग्री वाहतूक, औद्योगिक वसाहती पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यातच विनापरवाना बायोडिझेल विक्रीचाही फटका बसला होता. कोरोना लॉकडाउन व अनलॉक काळातही पेट्रोलपंप व्यावसायिक व पंपावरील कर्मचाऱ्यांनी कोरोनायोद्ध्यांसह अत्यावश्‍यक सेवेतील विविध घटकांना जोखीम स्वीकारून इंधनपुरवठा केला. धिम्या गतीने का होईना इंधन विक्री पूर्वपदावर येत असल्याने शासनाच्या महसुलालाही हातभार लागणार आहे. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात


जिल्ह्यातील स्थिती 
४५० 
पेट्रोलपंप 

चार हजार ५०० 
कर्मचारी संख्या 

एक कोटी ९५ लाख लिटर 
पेट्रोल विक्री (ऑगस्ट) 

तीन कोटी २२ लाख लिटर 
डिझेल विक्री (ऑगस्ट)  

 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

संपादन - ज्योती देवरे