
पोलिस आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली अन् ऐन कोरोना संकटकाळात शासकीय नियम धाब्यावर बसवत भाजपच्या प्रदेश व शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका पदाधिकारी महिलेच्या पतीने सिडकोत भररस्त्यात वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून, यावर पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
सिडको (नाशिक) : पोलिस आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली अन् ऐन कोरोना संकटकाळात शासकीय नियम धाब्यावर बसवत भाजपच्या प्रदेश व शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका पदाधिकारी महिलेच्या पतीने सिडकोत भररस्त्यात वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून, यावर पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेत्याचा सिडकोत भररस्त्यात वाढदिवस
केंद्रात व नाशिक महापालिकेतही सत्तेत असलेल्या भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, शासन-प्रशासन, पोलिस यंत्रणा आदी सर्वांकडूनच कोरोना संकट काळात वर्तणूक व सावधगिरी बाळगण्याबाबत सातत्याने संदेश देत आहेत. त्यासाठी प्रसंगी जिवाचा आटापिटा करून कळकळीची विनंती केली जात आहे. आरोग्य विभागाकडूनही वारंवार सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगण्यात येत आहे.
सपशेल दुर्लक्ष
याशिवाय, कोरोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेशी सामना करण्याचीही सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू असताना अनेक जण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यात लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. असाच काहीसा संतापजनक प्रकार सिडकोत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बघायला मिळाला. भाजपच्या शहर कार्यकारिणीत पदाधिकारी असलेल्या एका महिलेच्या पतीदेवांचा वाढदिवस राका चौकात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...
मुद्दाम भररस्त्यात घेण्यात आला कार्यक्रम
त्यासाठी बॅनरबाजी, मंडप, स्टेज, साउंड सिस्टिम या सर्वांची जय्यत व्यवस्थाही करण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर हा कार्यक्रम सर्वांना दिसावा व गाजावाजा व्हावा, या हेतूने तो मुद्दाम भररस्त्यात घेण्यात आला. मात्र, यामुळे वाहनधारकांनाही वेठीस धरले जात होते. अंबड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त होत असून, पोलिस व मनपा प्रशासन नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सिडकोवासीयांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..
Web Title: Bjp Leaders Birthday Cidco Nashik Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..